ओझर येथील विमानतळावरुन सुरु असलेली विमानसेवा देखभाल आणि दुरूस्तीसाठी पुढील काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.सध्या हिंदुस्थान एरोनाॅटिक्स लिमिटेडची (एचएएल) मालकी असलेल्या ओझर विमानतळावरून स्पाईस जेट कंपनीद्वारे नाशिक ते नवी दिल्ली आणि नाशिक ते हैद्राबाद या दोन ठिकाणी विमानसेवा दिली जाते. परंतु, विमानपट्टी दुरूस्ती आणि देखभालसाठी २० नोव्हेंबर ते तीन डिसेंबर या कालावधीत ही विमानसेवा बंद राहणार आहे.
हेही वाचा >>>‘हे सरकार फक्त जाहिरातबाजी, पोस्टरबाजीवर चालत आहे’; आमदार निलेश लंके यांची टीका
हवाई वाहतूक संचालनालयाच्या सुचनेनुसार धावपट्टीची देखभाल, दुरूस्ती आणि मजुबूती यावर काम केले जाते. या कामामुळे कुठलेही विमान धावपट्टीवर उतरू किंवा उड्डाण घेऊ शकणार नाही. या पार्श्वभूमीवर स्पाईस जेट कंपनीने विमानसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. चार डिसेंबरपासून धावपट्टी नियमित वाहतूक सेवेसाठी कार्यरत राहील. प्रवाश्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन कंपनीच्या वतीने करण्यात आले आहे.