नाशिक : लोकसभा निवडणुकीत फटका बसला. तसा विधानसभेला बसू देऊ नका. निवडणुकीत सावरून घ्या, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिन्नर येथे केले. जनसन्मान यात्रेच्या तिसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी उपमुख्यमंत्री पवार यांनी शिर्डी येथे दर्शन घेतले. नंतर सिन्नर विधानसभा मतदारसंघात उद्योजक-कामगार आणि शेतकरी मेळाव्यात त्यांनी संवाद साधला. लोकसभेच्या निकालाची विधानसभा निवडणुकीत पुनरावृत्ती होऊ नये म्हणून साकडे घालताना पवार यांनी मतदारांना आपली चूक दुरुस्त करण्याचा सल्ला दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रवादीने तुमचे प्रश्न सोडविण्यासाठी राजकीय निर्णय घेतला. विरोधी पक्षात असतो तर, सव्वा वर्षात नाशिक जिल्ह्यास १२ हजार कोटींचा निधी देता आला नसता. सगळी कामे ठप्प झाली असती. लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांना वीज माफीसारख्या योजना करता आल्या नसत्या, याकडे त्यांनी लक्ष वेधले. लाडकी बहीण योजनेवर टीका करणारे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले आहेत. त्यांना दीड हजार रुपयांचे महत्व काय माहिती, असा प्रश्न त्यांनी केला.

हेही वाचा…अडचणीतील नाशिक जिल्हा बँकेला ७०० कोटींची हमी, विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार यांची मतपेरणी

राज्यातील उद्योग परराज्यात चालल्याचा अपप्रचार विरोधकांकडून केला जातो. त्यात तथ्य नाही. उलट राज्यात उद्योग वाढीसाठी प्रयत्न सुरू असून बंगळुरू येथील टोयाटो प्रकल्प छत्रपती संभाजीनगर येथे आणण्यासाठी जपानमधील कंपनीशी सहकार्य करार करण्यात आला. उद्योगपती संजय जिंदाल यांच्याकडून परराज्यात उभारले जाणारे ४० हजार कोटींचे प्रकल्प राज्यात आणण्यात यश आल्याचा दावाही पवार यांनी केला.

हेही वाचा…मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेराव घालण्याआधीच…

जर्मनीत चार लाख युवकांना रोजगार

राज्यातील विशिष्ट कौशल्य धारण करणाऱ्या सुमारे चार लाख युवावर्गास जर्मनीबरोबर झालेल्या करारानुसार रोजगार मिळणार आहे. फ्रान्स आणि जपानमधून कुशल मनुष्यबळाला मागणी आहे. तिथेही तसे प्रयत्न केले जातील. बाहेर जावून काम करण्याची मानसिकता ठेवली पाहिजे, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सूचित केले. उद्योगांची कुशल मनुष्यबळाची गरज भागविण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या अभ्यासक्रमात बदल करून, त्यांना आधुनिक यंत्रसामग्री व सोयी सुविधा देऊन बळकटीकरण केले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar appeals to voters in sinnar during jan samman yatra to avoid lok sabha result repeats in assembly elections psg