लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) वतीने महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने काढण्यात आलेली मंगल कलश यात्रा २९ एप्रिल रोजी जिल्ह्यात येत असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार यांनी दिली आहे.

अजित पवार गटाच्या वतीने मुंबई येथे महाराष्ट्र दिनानिमित्त एक ते चार मे या कालावधीत गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण राज्यात ‘महाराष्ट्र गौरव रथ : मंगल कलश यात्रा’ काढण्यात येत आहे. उत्तर महाराष्ट्रातील यात्रा मंगळवारी जळगाव, नंदुरबार, धुळेमार्गे नाशिक जिल्ह्यात येणार आहे. जिल्हा अजित पवार गटाच्या वतीने नाशिक – धुळे हद्दीवरील झोडगे येथे या मंगल कलश यात्रेचे स्वागत करण्यात येणार आहे.

कळवण तालुक्यातील सप्तशृंगीदेवी मंदिर, मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी येथील खंडोबा महाराज मंदिर, नांदगाव तालुक्यातील नस्तनपूर येथील शनि महाराज मंदिर, चांदवड येथील रेणुका देवी मंदिर, अतिप्राचीन हेमाडपंथी माणकेश्वर महादेव मंदिर या मंदिरांतील माती तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बागलाण तालुक्यातील किल्ले साल्हेर, किल्ले मुल्हेर, चांदवड तालुक्यातील किल्ले धोडप, दिंडोरी तालुक्यातील किल्ले रामशेज येथून आणलेली माती मंगल कलशात विधीपूर्वक अर्पण करण्यात येणार आहे.

गिरणा, मोसम नदी यांच्या संगमासह सुरगाणा तालुक्यातील विविध नद्यांच्या संगमावर पूजन करून तेथील जलही मंगल कलशात टाकण्यात येणार आहे. पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या चांदवड येथील रंगमहालाची माती, येवला येथील मुक्तिभूमी,पेठ येथील हुतात्मा देवाजी राऊत यांच्या स्मारकातील मातीही कलशात अर्पण करण्यात येणार आहे. यशवंतराव चव्हाण यांच्यामुळे ओझर येथे झालेल्या एच.ए .एल. कारखान्यातील मातीही कलशात घेण्यात येणार आहे.

नाशिक शहर आणि सिन्नर तालुक्यात अशाच प्रकारचे कार्यक्रम होतील. ३० एप्रिल रोजी महाराष्ट्र गौरव रथ : मंगल कलश यात्रा अहिल्यानगर जिल्ह्याकडे जाईल.