नाशिक : गतवेळी महायुती सरकारमध्ये उशिराने सहभागी झालेल्या राष्ट्रवादीला (अजित पवार) बरेच प्रयत्न करूनही नाशिकचे पालकमंत्रिपद अखेरपर्यंत मिळाले नव्हते. शिवसेनेने (एकनाथ शिंदे) त्यांची मागणी धुडकावली होती. यामुळे यंदा महायुतीचे सरकार स्थापन होण्यापूर्वीच अजित पवार गटाने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. या पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नाशिकचे पालकमंत्री व्हावे म्हणून युवक राष्ट्रवादीच्यावतीने महादेवाला दुग्धाभिषेक करून साकडे घालण्यात आले. याबद्दल खुद्द भुजबळ यांनी आनंद व्यक्त करुन खातेवाटप झाल्यानंतर तीनही पक्षांचे नेते याविषयी निर्णय घेतील, असे नमूद केले.
गतवेळी बरेच प्रयत्न करूनही मिळू न शकलेल्या पालकमंत्रिपदाबाबत अजित पवार गट आधीच सक्रिय झाला आहे. जिल्ह्यात संख्याबळाच्या दृष्टीने पक्षाचे सात आमदार आहेत. तुलनेत मित्रपक्ष भाजपचे पाच तर, शिंदे गटाचे दोन आमदार आहेत. मागील वेळी शिंदे गटाने पालकमंत्रिपद न सोडल्यामुळे भुजबळ हे कधीही तत्कालीन पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीकडे फिरकले नव्हते. या एकंदर परिस्थितीत यावेळी कुठल्याही परिस्थितीत या पदावर दावा सांगून शिंदे गटाला शह देण्याची तयारी अजित पवार गोटातून होत आहे.
हेही वाचा…अजित पवार गटात अपूर्व हिरे यांचा प्रवेश ?
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा भुजबळ समर्थक अंबादास खैरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी सोमवारी भुजबळ हेच जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावेत, यासाठी महादेवाच्या पिंडीला दुग्धाभिषेक करत साकडे घातले. पक्षात भुजबळ हेच ज्येष्ठ नेते असून त्यांनी सर्वाधिक वेळा नाशिकचे पालकमंत्रिपद भूषवले आहे. आगामी कुंभमेळ्यात नाशिकचे नाव जागतिक पातळीवर चर्चिले जाणार आहे.
भुजबळ हे पालकमंत्री असताना कुंभमेळा झाला होता. त्यांनी केलेले यशस्वी नियोजन व विकास कामे आजही आठवणीत आहेत. मागील कुंभमेळ्यात पालकमंत्री नसताना देखील त्यांनी अनेक कामे केल्याचे निदर्शनास येते, याकडे पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले. जिल्ह्यातील १५ पैकी सर्वाधिक सात जागांवर अजित पवार गटाने विजय मिळवला असून पक्षाच्या सर्वाधिक आमदारांचा हा जिल्हा झाला आहे. त्यामुळे जिल्ह्याचा योग्य विकास व कुंभमेळ्याच्या यशस्वी नियोजनासाठी भुजबळ यांनाच पालकमंत्री पद मिळावे, अशी नाशिककरांची इच्छा असून ही मागणी पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्याकडे मांडली आहे.
हेही वाचा…जळगाव स्थानकात रेल्वेच्या धडकेने युवकाचा मृत्यू, एक जण जखमी
आपण पालकमंत्री व्हावे ही लोकांची इच्छा आहे. त्यांनी श्रद्धेने परमेश्वराकडे साकडे घातले ही आनंदाची गोष्ट आहे. शेवटी महायुतीत तीनही पक्षांचे प्रमुख कोणते खाते कोणाला द्यावयाचे हे ठरवतील. ते झाल्यानंतर संबंधितांकडून पालकमंत्री निश्चित केले जातील. छगन भुजबळ