लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्यावतीने राज्यात जनसन्मान यात्रेची सुरुवात दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून गुरुवारपासून होत आहे. उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या यात्रेत आदिवासी शेतकरी मेळावा, द्राक्ष उत्पादकांशी चर्चा, महिलांसह विविध घटकांशी संवाद आदी कार्यक्रमांचे नियोजन वेगवेगळ्या मतदारसंघात करण्यात आले आहे. यात्रेच्या पहिल्या दिवशी म्हणजे गुरुवारी सायंकाळी अजित पवार हे पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात दर्शन घेणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाला फारसे यश मिळाले नाही. राज्यात चारपैकी केवळ एका जागेवर विजय मिळाला. दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाने अजित पवार गटच नव्हे तर, महायुतीशी जोरदार लढत देत राज्यात आठ जागांवर विजय मिळवला. या निकालाने अजित पवार गटाला हादरा बसला. विधानसभेत याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून अजित पवार गटाने कंबर कसली आहे. महायुती सरकारने महिला, युवक, शेतकरी आदी घटकांसाठी विविध योजना जाहीर केल्या. त्याविषयी जनजागृती अजित पवार गट जनसन्मान यात्रेतून करणार आहे. राज्यस्तरीय यात्रेची सुरुवात गुरुवारी विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ यांच्या दिंडोरी मतदारसंघातून होत आहे. दोन दिवसीय दौऱ्यात विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.

आणखी वाचा-वादग्रस्त भूसंपादनावरून मनपा आयुक्त लक्ष्य; नाशिक महापालिकेत घोषणाबाजी, ठिय्या; भाजप आमदार, पालकमंत्र्यांवर दुर्लक्षाचा आरोप

उपमुख्यमंत्री पवार हे गुरुवारी सकाळी विमानाने ओझर विमानतळावर उतरतील. दिंडोरी मतदारसंघात त्यांच्या उपस्थितीत आदिवासी शेतकरी मेळावा होईल. दुपारी मोहाडी येथील सह्याद्री फार्म्स या शेतकरी उत्पादक कंपनीत ते द्राक्ष उत्पादकांशी चर्चा करणार आहेत. शहरात परतल्यानंतर तीन वाजता ते पंचवटीतील श्री काळाराम मंदिरास भेट देऊन दर्शन घेतील. आमदार सरोज अहिरे यांच्या देवळाली मतदारसंघात सायंकाळी पाच वाजता महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने पवार हे महिलांशी संवाद साधतील. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी आमदार दिलीप बनकर यांच्या निफाड मतदारसंघात शेतकरी मेळावा आणि दुपारी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात पैठणी तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी पवार हे संवाद साधणार आहेत. शनिवारी सकाळी ते शिर्डीला दर्शनासाठी मार्गस्थ होतील. नंतर सिन्नर मतदारसंघात शेतकरी आणि उद्योजकांशी बैठकीतून संवाद साधणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार यांनी दिली.

आणखी वाचा-नाशिक : सिन्नरमध्ये दुचाकीस्वाराला लुटणारी टोळी ताब्यात, आठ जणांना अटक

जनतेशी सद्भावनेचे बंध दृढ करणे, कार्यतत्परतेला जनविश्वासाची जोड मिळावी, हे यात्रेचे उद्दिष्ठ्य आहे. पक्षाची विचारधारा राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचविण्यासाठी ही यात्रा आहे. युवावर्ग, महिला, आदिवासी व शेतकरी बांधव आदी सर्व समाज घटकातील लोकांशी थेट संवाद साधण्यात येणार आहे. जेणेकरून त्यांच्या अडीअडचणी, समस्या जाणून घेत त्यांचे निवारण करणे शक्य होईल. या यात्रेच्या माध्यमातून विरोधकांचा खरा चेहरा जनतेसमोर आणणे हा प्रामाणिक उद्देश असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. महायुती सरकारने जाहीर केलेल्या योजनांवर विरोधकांकडून आक्षेप घेतला जात आहे. त्यांना प्रत्युत्तर देण्याचे काम यात्रेतून उपमुख्यमंत्री पवार हे करतील. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्ह्यात सहा आमदार आहेत. दिंडोरी, निफाड, येवला, देवळाली व सिन्नर विधानसभा मतदारसंघात जनसन्मान यात्रा जाणार आहे.