नाशिक – विधानसभा निवडणुकीआधी शिवसेनेत (उद्धव ठाकरे) प्रवेश केलेले माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी सोमवारी राष्ट्रवादीचे (अजित पवार) अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेतल्याने हिरे हे अजित पवार गटात प्रवेश करण्याची चर्चा रंगली आहे. हिरे यांनी मात्र ही सदिच्छा भेट होती, अशी सारवासारव केली आहे.

हेही वाचा – पतंगीच्या नायलाॅन मांजामुळे वृध्दाच्या गळ्यास जखम

हेही वाचा – जळगाव स्थानकात रेल्वेच्या धडकेने युवकाचा मृत्यू, एक जण जखमी

माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांचे अजित पवार यांच्याशी पूर्वीपासून जिव्हाळ्याचे संबध आहेत. पवार यांनी विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या यशामुळे सोमवारी हिरे यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये विधानसभा निवडणुकीसह आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांबाबत चर्चा झाली. आगामी निवडणुका पाहता अजित पवार यांनी हिरे यांना पुन्हा नव्या दमाने काम करण्याची सूचना केल्याचे समजते. जिल्ह्यात अजित पवार गटाने विधानसभा निवडणुकीत सातपैकी सात जागा जिंकून दणदणीत यश मिळविले. जिल्ह्यातील पक्षाचे हे यश पाहता पक्षाची पुढील ध्येयधोरणे, रणनीती तसेच आगामी निवडणुकांवर चर्चा करण्यासाठी हिरे यांना पुन्हा भेटीचे निमंत्रण दिले आहे. पाच डिसेंबरला नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. हा शपथविधी सोहळा झाल्यानंतर अजित पवार यांनी आपल्याला बैठकीसाठी निमंत्रण दिल्याचे हिरे यांनी सांगितले. या घडामोडींवरुन हिरे हे घरवापसी करणार असल्याचे दिसत आहे.