लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाशिक : देवळाली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे (अजित पवार) घड्याळ आणि शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) धनुष्यबाण ही दोन्ही चिन्हे परस्परांविरोधात उभी ठाकल्याने कोणाचा प्रचार करावा, असा संभ्रम शिवसैनिकांचा झाला आहे. तूर्तास कोणाच्याही प्रचारास न जाता वरिष्ठांच्या आदेशाची प्रतिक्षा करण्याची सूचना पदाधिकाऱ्यांनी शिवसैनिकांना मेळाव्यात केली. महत्वाची बाब म्हणजे, पक्षाच्या मेळाव्यास उमेदवार राजश्री अहिरराव या अनुपस्थित होत्या.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी शिंदे गटाने देवळालीत अजित पवार गटाच्या आमदार सरोज अहिरे यांच्या विरोधात राजश्री अहिरराव यांना एबी अर्ज दिला होता. माघारीच्या अंतिम दिवशी शिंदे गटाच्या उमेदवार गायब झाल्या. संपर्क साधूनही त्या उपलब्ध न झाल्याने पक्षाने निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र देऊन त्यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी केली होती. तथापि, निकषानुसार उमेदवाराच्या स्वाक्षरीचा विहित नमुन्यात अर्ज प्राप्त झाला नसल्याने विनंती अमान्य झाली. त्यामुळे अहिरराव या शिंदे गटाच्या अधिकृत उमेदवार असल्यावर शिक्कामोर्तब झाले. या घटनाक्रमात शिंदे गटाची कोंडी झाली.

आणखी वाचा-पंतप्रधानांच्या सभेमुळे शहरात ड्रोन उडविण्यास बंदी, पोलिसांकडून सुरक्षिततेचे उपाय

या पार्श्वभूमीवर, मंगळवारी देवळाली येथे शिंदे गटाचा मेळावा पार पडला. यावेळी माजी खासदार हेमंत गोडसे, बंटी तिदमे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. पक्षाच्या उमेदवार अहिरराव या अनुपस्थित होत्या. यावेळी काहींनी धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढविण्याचा आग्रह धरला. सद्यस्थितीत शिवसैनिकांनी अजित पवार गट किंवा शिंदे गटाच्या उमेदवार अशा कुणाच्याही प्रचारात सहभागी होऊ नये, अशी सूचना करण्यात आली. राज्यात देवळाली आणि श्रीरामपूरसह तीन ठिकाणी पक्षाकडून एबी अर्ज दिले गेले आहेत. वरिष्ठ नेते विचार करून योग्य तो निर्णय घेतील. जोपर्यंत आपल्याला स्पष्ट आदेश येत नाहीत, तोपर्यंत कोणी कुठेही प्रचाराला जावू नये, असे सूचित करण्यात आले. पक्ष नेतृत्व जो निर्णय घेईल, त्यामागे सर्वांनी उभे रहायचे आहे. लवकरच हा निर्णय होईल आणि शिवसैनिक प्रचारात सहभागी होतील, असे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

आणखी वाचा-मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनात घबाड

देवळालीत एबी अर्ज देण्याचे धाडस पक्षाच्या अंगलट आल्याचे चित्र आहे. सूचना करूनही अधिकृत उमेदवाराने माघार न घेतल्याने पक्षाची दुहेरी कोंडी झाली आहे. बंडखोरी रोखण्यासाठी केलेली धडपड व्यर्थ ठरली. आता पदाधिकारी आणि शिवसैनिकांना नेमका कोणाचा प्रचार करायचा, हा प्रश्न आहे. शिवसैनिक कोणाच्यातरी प्रचारात सहभागी होऊन अडचणीत भर पडू नये, याची खबरदारी मेळाव्यातून घेण्यात आली. काही शिवसैनिकांनी धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढविण्याचा आग्रह धरला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar or eknath shinde whom to support in devalali confusion for shinde group mrj