बिहार राज्याने संपूर्ण दारूबंदीचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह असून लोककल्याणकारी व पुरोगामी म्हणविणाऱ्या महाराष्ट्र शासनानेही दारूबंदीचा निर्णय घ्यावा, अशी प्रतिक्रिया राज्य नशाबंदी मंडळाचे जिल्हा संघटक पां. भा. करंजकर यांनी व्यक्त केली आहे. माणसाला माणूस म्हणून घडविण्याची आज खरी गरज असताना व्यसनाधीनतेच्या घडणाऱ्या घटना समाजमन अस्वस्थ करणाऱ्या असल्याचे मत करंजकर यांनी व्यक्त केले आहे. मालाडच्या दारूकांडाची घटना चिंताजनक होती. या घटनेतून शासनाने कोणताच बोध घेतलेला नाही. हे खेदजनक आहे. दारू विक्रीतून मोठय़ा प्रमाणावर महसूल मिळतो म्हणून दारूबंदी करावयाची नाही, असे शासनाचे सध्याचे धोरण आहे. परंतु विकासाचा केंद्रबिंदू असलेला मनुष्यच दारूमध्ये बुडाला तर त्या विकासाचा जनतेला काय फायदा ? दारूच्या वाढत्या धोक्यांबाबत आता जागृत होऊन संपूर्ण दारूबंदीचा निर्णय घोषित करून त्या निर्णयाची कठोरपणे अंमलबजावणी करावी, अशी मागणी करंजकर यांनी केली आहे.

Story img Loader