जायकवाडीसाठी जादा पाणी सोडल्याचा आरोप

जायकवाडी धरणापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी निश्चित केल्यापेक्षा अधिक पाणी प्रशासन गंगापूर धरणातून सोडत असल्याचा आरोप करत सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी दुपारी गोदापात्रात उतरून आंदोलन केले. अचानक झालेल्या आंदोलनामुळे पोलीस यंत्रणेची धावपळ उडाली.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जायकवाडी धरणात गंगापूर धरण समूहातून १.३६ तर दारणा धरण समूहातून ३.२४ टीएमसी पाणी देण्यात येणार आहे. सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी रविवारी रात्री गंगापूर धरणातील विसर्ग बंद पाडल्यानंतर सोमवारपासून कडेकोट बंदोबस्तात पुन्हा पाणी सोडण्यात आले. मंगळवारी या पाण्याचा वेग वाढविल्याने शहरातून वाहणारी गोदावरी दुथडी भरून वाहत आहे. शुष्क नदीपात्रामुळे हे पाणी जायकवाडी अपेक्षित वेगात जात नसल्याने विसर्ग वाढविण्यात आला. गंगापूर धरण समूहातून जायकवाडीला १.३६ टीएमसी पाणी द्यावयाचे आहे. परंतु, हे पाणी त्या ठिकाणी पोहोचावे यासाठी प्रशासनाने जादा पाणी सोडल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे देवांग जानी यांच्या नेतृत्वाखाली पुरोहित संघाचे सतीश शुक्ल, काँग्रेस व इतर पक्षांचे कार्यकर्ते दुपारी दीडच्या सुमारास रामकुंड परिसरात गोदापात्रात उतरले. नाशिकचे पाणी दिल्यामुळे पुढील काळात शहराला भीषण टंचाईस तोंड द्यावे लागणार आहे. या स्थितीत प्रशासन अधिकचे पाणी सोडत नाशिककरांवर अन्याय करत असल्याचा आरोप जानी यांनी केला. उच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ देऊन राजकीय पक्षांना आंदोलन करण्यापासून रोखले जात आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार गंगापूर धरण समूहातून १.३६ टीएमसी पाणी सोडणे बंधनकारक आहे. जायकवाडीत किती पाणी पोहोचले, याच्याशी आपला संबंध नाही. तरीदेखील तिथे जाऊन पाणी मापन करून देण्याचे प्रयोजन काय, असा प्रश्न आंदोलकांनी उपस्थित केला. या आंदोलनाची माहिती समजल्यानंतर पोलिसांनी धाव घेऊन पात्रातून आंदोलकांना बाहेर काढले.

Story img Loader