नाशिक – महायुतीत तीनही पक्षांनी आपला हक्क कायम ठेवल्याने नाशिकच्या जागेचा तिढा सुटलेला नसताना आणि सर्वपक्षीय इच्छुकांनी उमेदवारीसाठी विविध मार्गाने मोर्चेबांधणी चालवली असताना या स्पर्धेतून माघार घेणारे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी महायुतीत उमेदवारांचा तोटा नसल्याचे स्पष्ट करताना प्रत्येक पक्षातील नावांची यादी मांडून इच्छुकांची संख्या व स्पर्धा आणखी वाढविल्याचे दिसत आहे. तीनही पक्ष ज्या नावांवर विचार करीत आहेत, त्यासह अन्य नवीन नावे भुजबळांनी मांडली. नाशिकच्या जागेचा घोळ आधीच मिटत नसताना इच्छुकांची संख्या वाढल्याने गोंधळात आणखी भर पडल्याची चिन्हे दिसत आहेत.
नाशिकची जागा स्वत:कडे घेण्यासाठी महायुतीत तीनही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. याच कारणास्तव महिना होऊनही वरिष्ठ नेत्यांना हा पेच सोडविता आलेला नाही. शिंदे गटाच्या जागेवर भाजपने आधीपासून हक्क सांगितला. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी छगन भुजबळ यांचे नाव सुचविले होते. राष्ट्रवादी अजित पवार गटाने साताऱ्याच्या बदल्यात नाशिकची जागा अदलाबदल केल्याचे मानले जात होते. शिंदे गट आपली जागा सोडण्यास तयार नाही. निर्णय होण्यास विलंब होत असल्याने उमेदवारीच्या स्पर्धेतून भुजबळ यांनी स्वत: माघार घेत असल्याचे जाहीर केले.
हेही वाचा >>> नाशिकमध्ये ‘वंचित’तर्फे करण गायकर उमेदवार
माघारीनंतर भुजबळ हे प्रथमच नाशिकला आले. मंगळवारी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. नाशिकच्या जागेचा तिढा अजून कायम असल्याचे त्यांनी नमूद केले.
महायुतीतील प्रत्येक पक्षाकडे निवडणूक लढण्यासाठी सक्षम उमेदवार आहेत. परंतु, जागा कुणाला द्यायची हे ठरले पाहिजे. या जागेवर आजही राष्ट्रवादीचा दावा कायम असल्याचे त्यांनी सूचित केले. आमच्या पक्षात अनेक जण आहेत. ती सातत्याने काम करतात. निवडणुकीवेळी ते आलेले नाहीत, असा टोला हाणत भुजबळ यांनी माजी खासदार देविदास पिंगळे, सिन्नरचे आमदार माणिक कोकाटे, निवृत्ती अरिंगळे आणि महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे आदींची नावे घेऊन या विषयाला नवीन वळण दिले. तीनही पक्षांकडे उमेदवारांचा तोटा नाही. भाजपकडे तीन आमदारांशिवाय दिनकर पाटील, शांतिगिरी महाराज आहेत. शिवसेना शिंदे गटाकडे खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते असून ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनाही विचारणा करता येईल, असे भुजबळ यांनी सांगितले. महायुतीकडून ज्या उमेदवाराचे नाव निश्चित होईल, त्याच्या पाठिशी आम्ही उभे राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली. एकाचवेळी तीनही पक्षातील १० ते १२ जणांची नावे कथन करुन स्पर्धेत नसणाऱ्यांना भुजबळांनी स्पर्धेत आणून ठेवले आहे. ज्यांची नावे भुजबळांनी घेतली, त्यातील अनेक जण उमेदवारीच्या स्पर्धेत नव्हते. भुजबळांनी नामोल्लेख केल्यामुळे अनेकांना आकाश ठेंगणे झाल्याचे वाटत आहे.