अनिकेत साठे
अद्याप मुसळधार पाऊस झाला नसतानाही अनेक ठिकाणी खड्डे झाले आहेत. गेल्या वर्षी अशोका मार्गावर दुचाकी खड्डय़ात आदळून भावेश कोठारी यांना प्राण गमवावे लागले होते. दरवर्षी असे अपघात होतात. पण, ठोस उपाय होत नाही. या वर्षी खड्डय़ांमुळे एक-दोन अपघात झाले असले तरी जीवितहानी झालेली नाही. खड्डय़ांवर तात्पुरत्या मलमपट्टीचा खेळ सुरू आहे. खासगी कंपनीने गॅसवाहिनीसाठी अनेक भागातील रस्ते खोदले होते. पावसाळय़ाआधी महापालिकेने घाईघाईत डांबर टाकून त्यांची दुरुस्ती केली. त्या ठिकाणी रिमझिम पावसातही खड्डे पडले आहेत.
खड्डय़ांपासून महापौरांच्या शासकीय निवासस्थानासमोरील रस्ताही सुटलेला नाही. अलीकडच्या काळात बांधलेले रस्तेही खड्डेमुक्त नाहीत. गतवर्षी सुमारे सात ते आठ हजार खड्डे बुजविल्याचे प्रशासनाकडून सांगितले गेले होते. यंदाही रस्त्यांची कमी पावसात बिकट स्थिती होण्याच्या मार्गावर आहे. तीन वर्षांच्या मुदतीतील रस्त्यांची उन्हाळय़ात संबंधित ठेकेदारांकडून दुरुस्ती करून घेतल्याचा दावा केला गेला. मुदत संपलेल्या आणि जुन्या रस्त्यांवरील खड्डे मनपा बुजविते. त्यासाठी बारीक खडी, पेव्हर ब्लॉकचा आधार घेतला जातो. पावसाचा जोर वाढला की, ते पुन्हा उघडे पडतात. बुजविलेल्या खड्डय़ांवर दुरुस्तीकामी पुन्हा निधी खर्ची होतो. या काळात विशिष्ट मिश्रणाचा (कोल्डमिक्स) वापर करता येत नसल्याचे कारण देत पावसाळा संपेपर्यंत हा खेळ सुरू राहणार आहे.