सत्ताधारी दबावतंत्राचा वापर करीत असल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. आक्षेपार्ह या शब्दाची व्याख्या सर्वांत आधी ठरवली पाहिजे. पोलीस म्हणताहेत म्हणून नाही तर कायदेशीर भाषेत ते आक्षेपार्ह आहे का, हे तपासले पाहिजे, अशी मागणीही दानवे यांनी केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे महाप्रबोधन यात्रेनिमित्त धरणगावात आयोजित जाहीर सभेत युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यासंदर्भात दानवे यांनी जळगावात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
हेही वाचा- जळगाव: शरद कोळींविरुद्ध धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी आक्षेपार्ह नावाने आवाज दाबण्याचे प्रयत्न चालू आहेत. जनताही ते सहन करणार नाही आणि शिवसेना तर ते अजिबातच सहन करणार नाही. ज्यांनी गद्दारी केली आहे, ते शिवसेनेच्या बाहेर गेले आहेत. परंतु जी संघटना आहे, जी जनतेची शक्ती आहे, जनतेचा आशीर्वाद आहे, ते शिवसेनेसोबतच आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वासोबतच आहे. हे आता हळूहळू महाराष्ट्रात स्पष्ट होऊ लागले आहे. म्हणूनच अशा पद्धतीने खोटे गुन्हे दाखल करणे, कारवाया करणे, भाषणाला बंदी घालणे, एखाद्याच्या सभेसमोर दुसर्याची सभा आयोजित करणे, सभेला परवानगी न देणे, अशा पद्धतीने हुकूमशाही महाराष्ट्रात सद्यःस्थितीत अनेक ठिकाणी चालू आहे. असा आरोप दानवेंनी केला आहे.
हेही वाचा- पालकमंत्र्यांच्या संपर्क कार्यालयासाठी विधानसभा उपाध्यक्षांना ‘खो’
महाराष्ट्रातील जनता सुजाण आहे, निश्चित या विषयावर जनता योग्य वेळी, योग्य उत्तर देईलच. अशा या पोलीस कारवाईला शिवसेना मुळीच घाबरत नाही. एक नाही तर हजारो गुन्हे दाखल होऊ द्या, अशा प्रकारच्या गुन्ह्यांना शिवसैनिक कधीच घाबरत नाही. शिवसेनेच्या या महाप्रबोधन यात्रेला महत्त्व आहे. शिवसेनेच्या व्यासपीठावरून जे भाषण होते आहे, त्यालाही महत्त्व आहे. याचा अर्थ या भाषणांतून जनतेचे मतपरिवर्तन होते आहे आणि जे गद्दार गेले आहेत, त्यांच्या पायाखालची वाळू सरकतेय, हे स्पष्ट होतेय, असेही ते म्हणाले.