प्राणवायूची उपलब्धता वाढविण्यावर लक्ष
नाशिक : करोना संसर्गाच्या रुग्णांवरील उपचारात प्राणवायू हा अत्यंत महत्त्वाचा घटक असल्याने तो रुग्णांना वेळेत मिळणे अत्यावश्यक आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात द्रवरूप प्राणवायूची वाहतूक करणारे टँकर आणि सिलिंडरची वाहतूक करणाऱ्या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा देण्यात येणार आहे, या वाहनांना रुग्णवाहिकेचे सर्व नियम लागू असतील.
करोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने प्राणवायूचा तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, औद्योगिक पुरवठा थांबवून तो वैद्यकीय क्षेत्राकडे वळविण्याचे नियोजन सुरू आहे.
सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली प्राणवायू पुरवठय़ाबाबत बैठक झाली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे, अन्न औषध प्रशासन विभागाच्या साहाय्यक आयुक्त माधुरी पवार, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश भामरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे आदी उपस्थित होते. आपल्या जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्राची प्राणवायूची मागणी पूर्ण करून घेण्याची जबाबदारी जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांची राहील.
प्राणवायू तयार करणाऱ्या उद्योगांवर लक्ष ठेवण्यासाठी पथके तयार करण्यात यावीत. तसेच ज्या उद्योगांच्या प्राणवायू वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत, अशा उद्योगांकडे परस्पर प्राणवायूचा पुरवठा होणार नाही याची सतत पडताळणी करावी, असेही सूचित करण्यात आले.
जिल्ह्यात प्राणवायुचा उपलब्ध साठा, त्याची उपलब्धता वाढविण्यासाठी करण्यात येणारे प्रयत्न याबाबत अन्न-औषध विभागाच्या सहायक आयुक्त माधुरी पवार यांनी माहिती दिली. जिल्ह्यात सध्या पुरेसा प्राणवायू आहे. त्याचा पुरवठा सर्व रुग्णालयांना योग्य प्रकारे होईल याची शहानिशा अन्न औषध प्रशासनाने करावी. त्याचा दैनंदिन अहवाल आपत्कालीन कार्य केंद्राकडे द्यावा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. एकंदरीत प्राणवायूचा पुरवठा, वैद्यकीय-औद्योगिक वापरात समन्वय तसेच टँकर अथवा प्राणवायू सिलिंडरची वाहतूक करणाऱ्या वाहनांची सुलभ वाहतूक या सर्व बाबींचे संनियंत्रण निवासी उपजिल्हाधिकारीसह आयुक्त अन्न-औषध प्रशासन, महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र, साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक यांची समिती बारकाईने करेल अशा सूचना जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिल्या.
पुरवठय़ात समतोल साधण्याचा प्रयत्न
नाशिक आणि मालेगाव महानगरपालिका, ग्रामीण भाग यांतील मोठय़ा, मध्यम आणि लहान रुग्णालयात प्रतिदिवस सरासरी किती प्राणवायूची आवश्यकता आहे, याबाबत अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे यांनी प्रत्यक्ष वापराची माहिती घेऊन तांत्रिक माहिती संकलित करावी. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णालयांना आवश्यकतेनुसार प्राणवायूचा पुरवठा करणे सोयीचे होईल. जिल्ह्यातील उपलब्ध प्राणवायूचा पुरवठा सर्व रुग्णांना योग्य प्रकारे होईल, त्यामध्ये कोणत्याही प्रकारे हयगय होणार नाही याची दररोज खात्री करावी, दैनंदिन अहवाल आपत्कालीन कार्य केंद्राला पाठवावा, असे निर्देश जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिले.