जळगाव – शहरात भाजपतर्फे राष्ट्रीय नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आयोजित युवा संमेलनात युवकांच्या समस्यांपेक्षा देशासह महाराष्ट्रातील राजकीय समस्याच अधिक मांडल्या गेल्या. शहा यांचे संपूर्ण भाषण विरोधकांवर टीका करण्याभोवतीच फिरत राहिले. त्यामुळे युवा संमेलन हे राजकीय संमेलन झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यात महायुतीसह महाविकास आघाडीच्या राष्ट्रीय, राज्यस्तरीय नेत्यांचे दौरे वाढले आहेत. सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौर्‍यात विविध विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्यांतून आणि दुसर्‍या दिवशी मंगळवारी भाजपकडून युवा संमेलनाच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करण्यात आले. दोन आठवड्यांपूर्वी अमित शहा यांचा दौरा अचानक रद्द झाल्यामुळे युवा संमेलनही रद्द झाले होते. मात्र, त्यानंतर शहा यांच्या दौऱ्याची तारीख निश्‍चित झाल्यानंतर पुन्हा जय्यत तयारी करण्यात आली. मंगळवारी नियोजित वेळेनुसार तासभर उशिरा झालेल्या युवा संमेलनात शहा यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांसह खान्देशातील तिन्ही जिल्ह्यांतील युवक व भाजपच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती. त्यात लोकसभेसाठी इच्छुकांची व्यासपीठावर भाऊगर्दी होती. रावेरमधून इच्छुक अमोल जावळे व्यासपीठावर, तर डॉ. केतकी पाटील व्यासपीठाखाली पहिल्या रांगेत होत्या.

हेही वाचा – तुम्ही दहा वर्षात महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेले; नाना पटोले यांचा अमित शहा यांना टोला

लोकसभेच्या रावेर मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक आणि उत्तर महाराष्ट्रातून भाजपला संपविण्याची भाषा करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांचा नामोल्लेख शहा यांनी केला नाही. विशेष म्हणजे त्यांच्या स्नुषा भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांचा उल्लेख मेरी बहेन असा केल्याने रक्षा खडसे यांनाच उमेदवारी दिली जाण्याचे संकेत त्यांनी दिले. शहा यांनी युवकांना, तुमचे मत भाजपला नव्हे, तर लोकशाहीला मजबूत करणारे ठरेल, असे सांगितले. पहिल्यांदा मतदान करायला जाणार असाल तर चूक करू नका. मतदान करण्यापूर्वी विकास करणाऱ्यांचे चरित्र तपासून पाहा. मगच मतदान करा आणि कुटुंबियांनाही प्रेरित करा, अशा शब्दांत शहा यांनी तरुणाईला साद घातली.

संमेलनात प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचीही भाषणे झाली. तिन्ही नेत्यांच्या भाषणांत युवकांना आकर्षित करता येतील, अशा मुद्यांवर भर देण्यात आला. पंतप्रधान मोदी यांनी १० वर्षांत केलेली कामे व पुन्हा सत्ता मिळाल्यानंतर भविष्यातील भारताचे चित्र, युवकांचा रोजगार, २०४७ पर्यंत भारताला विकसित देश बनविण्याच्या भाजपच्या संकल्पांवर तिन्ही नेत्यांनी भर दिल्याचे दिसून आले.

हेही वाचा – धुळे जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रात परिषदेतून किती कोटींची गुंतवणूक ?

संमेलनाच्या माध्यमातून भाजपकडून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकण्यात आले. या माध्यमातून विधानसभेसह स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी इच्छुकांवर अधिक जबाबदारी देण्यात आल्याचे दिसून आले. शरद पवार यांच्यासह उद्धव ठाकरे यांच्यावर शहा यांनी केलेल्या टिकेमुळे भाजपची स्थानिक मंडळी मात्र सुखावली.

‘ते’ दोन खासदार कोण ?

युवा संमेलनाच्या निमित्ताने जळगावात जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी २५ मिनिटे झालेल्या बैठकीतील चर्चेत जळगाव, रावेर, धुळे, नंदुरबार लोकसभा मतदारसंघांतील सध्याची राजकीय परिस्थिती आणि लोकसभेसाठी इच्छुक उमेदवारांची माहिती गृहमंत्री अमित शहा यांना देण्यात आली. चारपैकी दोन खासदारांचा पत्ता कट होण्याची चर्चा यावेळी रंगल्याने ते दोन खासदार कोण, हे पदाधिकारी आपआपसात विचारताना दिसून आले.

शिवरायांचा जयजयकार

मराठा आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपवर मराठा समाजाचा रोष असल्याने, संमेलनात अमित शहा येण्यापूर्वी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी युवकांमध्ये जोश भरण्यासाठी छत्रपती शिवरायांच्या जयजयकाराच्या घोषणा देण्याचे काम केले. त्यानंतर तासभर उशिराने शहा यांचे आगमन झाल्यानंतर त्यांनीही भाषणाच्या सुरुवातीलाच भारत माता की जय, जय श्रीराम, जय शिवाजी… जय भवानी असा जयजयकार करीत, देशाच्या स्वाभिमानाची पायाभरणी छत्रपती शिवाजी महाराजांनी रचल्याचे सांगत शिवरायांना मानाचा मुजरा केला. छत्रपती शिवरायांचा अनेक वेळा भाषणातून उल्लेख करत मराठा समाजाला आकर्षित करण्याचा प्रयत्नही शहा यांनी केल्याचे दिसून आले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amit shah political tone at youth conference at jalgaon print politics news ssb