नाशिक : महाराष्ट्रातील घडामोडींचा परिणाम संपूर्ण देशात होत असल्याने विधानसभा निवडणुकीतील विजय महायुतीसाठी अतिशय महत्वाचा आहे. या विजयाने संपूर्ण देशात वेगळा संदेश देता येईल. ज्या तीन राज्यात आपली कधीही सत्ता नव्हती, तिथेही सत्ता आणता येईल. महाराष्ट्रातील यशावर ते अवलंबून आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. विरोधी पक्षांतील नेत्यांऐवजी गटस्तरीय लहान कार्यकर्त्यांना भाजपशी जोडावे, असे आवाहनही त्यांनी केले.
भाजपच्यावतीने बुधवारी येथील हॉटेल डेमोक्रसीत आयोजित कार्यकर्ता संवाद बैठकीत शहा यांनी विभागातील पाच जिल्ह्यांतील विधानसभा निवडणुकीचा आढावा घेऊन मार्गदर्शन केले. लोकसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रात महायुतीला ४७ टक्के मिळाली. विधानसभा निवडणुकीत हे प्रमाण ५१ टक्क्यांवर जाणे आवश्यक आहे. लाडकी बहीण योजनेचा सुमारे अडीच कोटी महिलांना लाभ होणार आहे. त्यामुळे साधारणत: ७० लाख मतांचा फरक भरून काढण्यासाठी प्रयत्न करावे लागणार असल्याकडे शहा यांनी लक्ष वेधले.
हेही वाचा >>>माथाडी राजकारणाला शिंदे सेनेची बगल ? मराठा बहुल मेळाव्यावर भाजपचा प्रभाव
भाजपने विरोधी पक्षांतील लहान कार्यकर्त्यांना आपल्याशी जोडण्याची तयारी केली असून शहा यांनी त्यासंदर्भात सूचना केल्या. नव्याने भाजपमध्ये येणाऱ्या कार्यकर्त्यांची भीती बाळगू नका, असेही त्यांनी नमूद केले. ‘वक्फ बोर्ड अधिनियम- १९९५’ या कायद्यात सुधारणा करण्यासाठी मांडलेल्या विधेयकाला हिवाळी अधिवेशनात मंजुरी दिली जाणार असल्याचे शहा यांनी सांगताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन, रावसाहेब दानवे उपस्थित होते.
पाडापाडीचे राजकारण करू नका
विधानसभा निवडणुकीत अंतर्गत हेव्यादाव्यांपासून दूर राहा, पाडापाडीचे राजकारण करू नका, असा संदेश अमित शहा यांनी दिला.