लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक: समृध्दी महामार्गावरील टोल नाक्यावर मनसेचे नेते अमित ठाकरे यांचे वाहन अर्धा तास रोखल्याच्या कारणावरून संतप्त मनसैनिकांनी या टोलनाक्याची रात्री तोडफोड केली. ठाकरे हे शिर्डीहून परतत असताना सिन्नर तालुक्यातील टोल नाक्यावर हा प्रकार घडला.
अमित ठाकरे हे चार, पाच दिवसांपासून नाशिक दौऱ्यावर आहेत. शनिवारी ते अहमदनगर, शिर्डी येथे गेले होते. समृध्दी महामार्गावरून ते नाशिककडे परतत असताना सायंकाळी साडेसात वाजता सिन्नर तालुक्यातील टोल नाक्यावर त्यांचे वाहन कर्मचाऱ्यांनी अडवले. स्वतःची ओळख देऊनही टोल नाक्यावरून वाहन सोडले गेले नाही. सुमारे अर्धा तास त्यांचे वाहन कर्मचाऱ्यांनी रोखून धरले. अरेरावीची भाषा केल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यावेळी अमित ठाकरे यांच्या समवेत कुणी पदाधिकारी नव्हते.
आणखी वाचा- ५६ इंच की छाती, कुछ काम नही आती’ मणिपूर प्रकरणी धुळ्यात युवा सेनेची घोषणाबाजी
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मनसेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर, मनविसेचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर, शहर उपाध्यक्ष अक्षय खांडरे व कार्यकर्त्यांनी रात्री दहा वाजता सिन्नर तालुक्यातील समृध्दी महामार्गावरील तो टोलनाका गाठला. लाठा-काठ्यांनी तोडफोड करीत घोषणाबाजी केली. जिल्ह्यातील अनेक टोल नाक्यांवर कर्मचारी मुजोरी करतात. अरेरावीची भाषा केली जाते. त्यांना धडा शिकवण्यासाठी ही तोडफोड करण्यात आल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.