नाशिक: अर्धांगवायूच्या आजाराने ग्रस्त आठ वर्षाच्या मुलाची मद्याच्या नशेत गळा दाबून हत्या करण्यात आली. या प्रकरणी संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

गणेश पुजारी (आठ) असे या बालकाचे नाव आहे. मंगळवारी दुपारी जेलरोडच्या कॅनॉल रस्त्यावरील मंगल मूर्तीनगर भागातील सोहम अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली. या ठिकाणी संशयित सुमित पुजारी हा तीन मुलांसह वास्तव्यास आहे. गणेश हा सर्वात लहान मुलगा होता. त्याला अर्धांगवायूचा आजार होता. सुमितची पत्नी सारिका सततच्या वादामुळे घर सोडून निघून गेली.

सुमित सकाळपासून सारिकाच्या कुटुंबियांना सारिका कुठे आहे, याबद्दल विचारणा करीत होता. दुपारी सारिकाच्या बहिणीला त्याने मी गणेशला मारले असून त्याला सारिकाच्या आईच्या घरी नेवून ठेवल्याचे सांगितले.

सारिकाची आई जेलरोड कॅनॉल रोड भागातील आम्रपाली झोपडपट्टीत राहते. आसपासच्या नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी संशयित सुमित पुजारीला ताब्यात घेतले. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मद्याच्या नशेत वडिलांनीच मुलाची गळा आवळून हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.