जळगाव – एरंडोल- मेहुणबारे (ता. चाळीसगाव) येथे तपासासाठी गेलेल्या आर्थिक गुन्हे शाखेच्या शासकीय वाहनावर जीर्ण झालेले चिंचेचे झाड कोसळल्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेच्या सहायक पोलीस निरीक्षकासह एका पोलीस कर्मचार्‍याचा जागीच मृत्यू झाला, तर तीन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले. ही दुर्घटना गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास एरंडोलपासून तीन किलोमीटरवरील कासोदा रस्त्यावरील अंजनी प्रकल्पाच्या उजव्या कालव्यानजीक घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अपघातानंतर कासोदा रस्त्यावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. अपघातग्रस्त वाहनावर पडलेले झाड कटरच्या सहाय्याने कापून तसेच जेसीबीच्या मदतीने उचलण्यात आले, तर मदतीसाठी आलेल्या तरुणांनी वाहनाचा पत्रा अक्षरश: हाताने तोडून त्यातील मृतदेह बाहेर काढले. पोलिसांच्या माहितीनुसार, जळगाव येथील आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन दातीर व त्यांचे सहकारी नीलेश सूर्यवंशी, चालक अजय चौधरी, चंद्रकांत शिंदे व भरत जेठवे हे चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथे शासकीय वाहनाने तपासासाठी गेले होते. मेहुणबारे येथून जळगाव येथे जात असताना कासोदा रस्त्यावरील अंजनी प्रकल्पाच्या उजव्या कालव्यानजीक रात्री नऊच्या सुमारास रस्त्याच्या कडेला असलेले चिंचेचे झाड पोलीस पथकाच्या वाहनावर कोसळले. झाडाच्या मोठ्या फांद्या वाहनावर पडल्यामुळे सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन दातीर आणि चालक अजय चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे सहकारी नीलेश सूर्यवंशी, चंद्रकांत शिंदे व भरत जेठवे हे गंभीर जखमी झाले. वाहनावर झाड कोसळल्याचे दिसताच, शेतात काम करून जाणारे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील यांनी अपघाताची माहिती पोलीस ठाण्याला कळविली. पोलीस निरीक्षक सतीश गोराडे, सहायक निरीक्षक गणेश अहिरे, हवालदार अनिल पाटील, मिलिंद कुमावत, प्रशांत पाटील यांच्यासह पोलीस कर्मचार्‍यांनी तसेच कासोदा पोलीस ठाण्याच्या सहायक निरीक्षकांसह कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले.

हेही वाचा – जळगाव : ‘जानकाबाई की जय’च्या नामघोषात रथोत्सवात भक्तांचा मेळा; पिंप्राळा उपनगरात भक्तिमय वातावरण

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, विकास संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील, माजी अध्यक्ष ज्ञानेश्‍वर पाटील, उपसरपंच रवींद्र पाटील, ग्रामपंचायतीचे सदस्य रवींद्र चौधरी यांच्यासह नागरिकांनी वाहनाच्या काचा फोडून जखमी कर्मचार्‍यांना बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन, माजी उपनगराध्यक्ष कुणाल महाजन, बाजार समितीचे संचालक किरण पाटील, कुणाल पाटील, सिद्धेश परदेशी, भरत महाजन यांच्यासह तरुणांनी मदतकार्य जोमाने सुरू केले. वाहनाचा पूर्णपणे चुराडा झाला होता. जेसीबीच्या सहायाने झाडाच्या फांद्या हलविण्यात आल्या, तर कटरच्या मदतीने फांद्या कापण्यात आल्या. सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर वाहनावर पडलेले झाड बाजूला करण्यात आले.

हेही वाचा – नाशिक: आरोग्य दूत तुषार जगतापचा गुटखा तस्करीत सहभाग; पोलिसांच्या ताब्यात

दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेच्या वाहनाला अपघात झाल्याची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्यासह सहायक अधीक्षक चंद्रकांत गवळी, चाळीसगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश चोपडे, अमळनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदलवाड यांनी ग्रामीण रुग्णालयात जखमी कर्मचार्‍यांची भेट घेऊन अपघाताबाबत माहिती जाणून घेतली. रस्त्याच्या मध्यभागी वाहनावर झाड उन्मळून पडल्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती.