अविनाश पाटील, नाशिक

नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा उमेदवारी मिळेल की नाही, याविषयी संभ्रमाचे वातावरण असताना आघाडीकडून राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून भुजबळ काका-पुतण्यांपैकी एक जण मैदानात उतरण्यावर केवळ शिक्कामोर्तब होणे बाकी आहे.

आतापर्यंत लोकसभेसाठी नाशिकच्या मतदारांनी काँग्रेसचे भानुदास कवडे यांचा अपवाद वगळता कोणाही खासदाराला दुसऱ्यांदा संधी दिलेली नाही. या निवडणुकीत गोडसे आणि समीर भुजबळ हे समोरासमोर आल्यास इतिहास बदलण्याची संधी दोघांसाठी असेल. गोडसे यांना उमेदवारी मिळून ते विजयी झाल्यास लागोपाठ दुसऱ्यांदा यश मिळविणारे ते कवडे यांच्यानंतरचे पहिलेच खासदार ठरतील. दुसरीकडे, राष्ट्रवादीकडून २००९ मध्ये खासदारकी मिळविणारे समीर भुजबळ हे उमेदवार राहिल्यास आणि त्यांच्या बाजूने मतदारांनी कौल दिल्यास कवडेनंतर दुसऱ्यांदा खासदार होणारे ते पहिलेच उमेदवार ठरतील.

शिवसेनेकडून उमेदवारीच्या शर्यतीत हेमंत गोडसे आणि जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्यात चुरस आहे. सध्या भाजपमध्ये असलेले सिन्नरचे माजी आमदार अ‍ॅड. माणिक कोकाटे, नाशिक बाजार समितीचे अध्यक्ष शिवाजी चुंभळे यांनीही शिवसेनेकडून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केल्याने अजून तरी शिवसेनेत उमेदवार कोण, हे रहस्य कायम आहे. २०१४ च्या निवडणुकीत गोडसे हे सेना-भाजप युतीचे उमेदवार होते. मोदी लाटेची साथ मिळाल्यामुळे गोडसे यांनी राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे बलाढय़ उमेदवार माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा दणदणीत पराभव केला होता. काही दिवसांपासून मतदारसंघात ठिकठिकाणी केंद्र आणि राज्य सरकारविरोधातील विविध आंदोलनांच्या मदतीने छगन भुजबळ यांचे पुतणे समीर यांनी सुरू केलेल्या जनसंपर्कामुळे राष्ट्रवादीचे तेच उमेदवार राहण्याची शक्यता अधिक आहे. २००९ च्या निवडणुकीत हेमंत गोडसे विरुद्ध समीर भुजबळ अशी लढत झाली होती. त्या निवडणुकीत गोडसे हे मनसेचे उमेदवार होते. चुरशीच्या लढतीत शिवसेना आणि मनसे यांच्यामध्ये झालेल्या मत विभागणीचा लाभ होऊन समीर भुजबळ यांचा विजय झाला होता. मोठे भुजबळ मैदानात राहिल्यास उमेदवार उभा न करण्याचा वंचित बहुजन आघाडीचा निर्णय त्यासाठी परिणामकारक ठरू शकतो.

मराठा समाजाचे दोन प्रबळ उमेदवार राहिल्यास २००९ प्रमाणे राष्ट्रवादीला लाभ होऊ शकतो, हे भुजबळ यांच्या उमेदवारीमागील गणित मांडले जात आहे.

संमिश्र कारकीर्द

वरिष्ठ नेत्यांनी अनेक तऱ्हेने प्रयत्न करूनही पक्षांतर्गत असलेले गटातटाचे राजकारण कमी न होणे, ही स्थानिक शिवसेनेपुढील डोकेदुखी आहे. त्यातही अमुक एका गटाचा असा शिक्का न बसणे, किंबहुना त्यापासून जाणीवपूर्वक स्वत:ला दूर ठेवणे आणि खासदार म्हणून कार्यरत असतांना कुठलाही गैरव्यवहाराचा आरोप न होणे, ही गोडसे यांच्यासाठी जमेची बाजू ठरू शकते. गोडसे यांच्या खासदारकीच्या कारकीर्दीत एकलहरे येथे रेल्वे चाक दुरुस्ती कारखान्याचे भूमिपूजन, नाशिक (ओझर) विमानतळावरून उडान योजनेंतर्गत प्रवासी वाहतुकीचे जाळे, नाशिक-आग्रा महामार्गावरील चौफुलींवरील वाढत्या अपघातांच्या पाश्र्वभूमीवर क. का. वाघ महाविद्यालय ते हॉटेल जत्रापर्यंत उड्डाणपुलाचे काम सुरू होणे, राज्यातील पहिले टेलिमेडिसीन केंद्र पांढुर्लीत सुरू होणे, दिल्ली-मुंबई राजधानी एक्स्प्रेस नाशिकमार्गे वळविणे आदी कामे झाली आहेत.

याशिवाय नाशिकरोडवर दत्तमंदिर ते द्वारका उड्डाणपुलासह इतरही काही कामांना मान्यता मिळाली आहे. असे असले तरी कांदा उत्पादकांच्या समस्या सोडविण्यासाठी भरीव प्रयत्न न होणे, नाशिक शहरात नवीन उद्योग आणण्यात आलेले अपयश, औद्योगिक वाढीस चालना न मिळणे, याचे उत्तर त्यांना द्यावे लागेल.

नाशिक लोकसभा मतदारसंघात कित्येक कोटींची कामे झाली आहेत, तर अनेक कामांना मंजुरी मिळाली आहे. नाशिक हे हवाई, रस्ते आणि रेल्वेमार्गाने इतर शहरांशी जोडण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मुंबई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेस नाशिकमार्गे सुरू करण्यात आली. नाशिक-कल्याण लोकलसाठी पाठपुरावा करण्यात आला असून ही सेवाही लवकरच सुरू होईल. रस्त्यांवर खड्डे दुरुस्तीसाठी इस्रोच्या मदतीने राज्यातील पहिला प्रयोग मतदारसंघात राबविण्यात येत आहे. शिलापूर येथे देशाच्या पश्चिम विभागासाठी शंभर एकरवर इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅब आणि एकलहरे येथे रेल्वे चाक दुरुस्ती कारखान्याचे भूमिपूजन करण्यात आले आहे. सिन्नरच्या दुष्काळावर मात करण्यासाठी गोरगाई-अप्पर वैतरणा-कडवा-देवनदी जोड प्रकल्पाला तत्त्वत: मान्यता मिळवली आहे. केंद्रीय पर्यटन विभागाच्या रामायण सर्किट योजनेत नाशिकचा समावेश करण्यात आला. नाशिकला नेट परीक्षा केंद्र सुरू करण्यात आले.      

      – हेमंत गोडसे (खासदार, शिवसेना)

विद्यमान खासदारांनी छोटी-मोठी कामे केली असली तरी खासदार म्हणून त्यांच्याकडून ज्या कामांची नाशिककरांना अपेक्षा होती, ती पूर्ण झालेली नाही. सभामंडप बांधणे वगैरे अशी कामे खासदारांनी करावीत, अशी अपेक्षा नाही. ठोस कामे झालेली नाहीत. नाशिकच्या औद्योगिक विकासाकडे दुर्लक्ष करण्यात आले. नवीन उद्योग, कंपन्या नाशिकमध्ये आल्या असत्या तर बेरोजगार युवकांना रोजगार मिळाला असता, परंतु तसे कोणतेही काम मागील साडेचार वर्षांत झाले नसल्याने युवकांना रोजगार मिळाला नाही.

– कोंडाजी आव्हाड (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस)