जिविताला धोका असल्याचा शिवानी यांचा दावा
अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी १८ महिन्यांत सापडतील, असा दावा करत अघोरी विद्येचे अनुष्ठान करणाऱ्या साध्वी शिवानी दुर्गा यांना प्रशासनाने जादुटोणाविरोधी कायद्यातंर्गत अटक करण्याची मागणी अंधश्रध्दा निर्मूलन समितीने केली आहे. दुसरीकडे, डॉ. दाभोलकरांचे मारेकरी शोधण्याचे आव्हान स्विकारल्यामुळे अंनिसपासून आपल्या जिविताला धोका निर्माण झाला असून प्रशासनाने आपणास संरक्षण द्यावे, अशी मागणी शिवानी दुर्गा यांनी केली आहे.
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला दोन वर्षांचा कालावधी उलटूनही अद्याप मारेकऱ्यांचा शोध लागलेला नाही. कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे दाखल झालेल्या आनंद आखाडय़ाच्या शिवानी दुर्गा यांनी पुढील १८ महिन्यांत डॉ. दाभोलकरांचे मारेकरी सापडतील अशी व्यवस्था तंत्रविद्येद्वारे करू, असा दावा केला. अंनिसने त्यांना आव्हान दिल्यानंतर त्यांनी त्र्यंबकेश्वरच्या जंगलात जाऊन विधी सुरू केला. हे सर्व कृत्य जादुटोणा विरोधी कायद्यातंर्गत गुन्हा ठरत आहे. प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेऊन शिवानी यांना त्वरीत अटक करावी, अशी मागणी अंनिसने केली आहे.
१८ महिन्यांत मारेकरी पकडून देण्याचा दावा करणे याचा अर्थ सदर व्यक्तीला मारेकऱ्यांविषयी माहिती असण्याची शक्यता आहे. याकडे लक्ष वेधत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही अंनिसने केली आहे. शिवार्नी यांनी त्यांचा दावा सिध्द केल्यास लोकवर्गणीतून जमा झालेले २१ लाख रुपये देऊन चळवळ बंद करण्यात येईल, असे अंनिसने
म्हटले आहे.
आपण अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे आवाहन स्विकारल्याने या समितीचे कार्यकर्ते आपल्यावर संतप्त झाले असल्याचा आरोप शिवानी यांनी केला आहे. संबंधितांकडून आपल्यावर हल्ला होऊ शकतो. आपणास पोलीस संरक्षण मिळावे, त्याबाबत पोलीस अधीक्षकांना सूचना द्याव्यात, असे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Story img Loader