लोकसत्ता वार्ताहर

धुळे : प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवारी अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी जिल्हा परिषदेवर थाळीनाद, लाटणे मोर्चा काढून ठिय्या दिला. यावेळी शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच महिला व बालविकास विभागाच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांसमोर निवेदनाद्वारे भावना व्यक्त केल्या.

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या अध्यक्षा शालिनी सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली सचिव शिलाबाई पाटील, उपाध्यक्षा सुनिता पाटील, सुषमा सोनवणे, संघटक भानुदास पाटील, जळगाव जिल्हाध्यक्षा सुषमाताई चव्हाण यांच्या शिष्टमंडळाने प्रशासनाला निवेदन दिले.

आणखी वाचा-गोदापात्रातील पानवेली निर्मूलनासाठी आता तणनाशकाचा प्रयोग; निरीच्या सहकार्याने नाशिक महापालिकेची तयारी

फेब्रुवारीमध्ये शासनाने केलेली मानधनातील वाढ अत्यल्प असून अंगणवाडी सेविकांना दरमहा २६ हजार आणि अंगणवाडी मदतनिसांना दरमहा २२ हजार रुपये मानधन मिळावे, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांची आणि आदेशांची अमलबजावणी व्हावी, दरमहा सेवानिवृत्ती वेतन मिळावे, केंद्र शासनाच्या आदेशानुसार लहान अंगणवाडी केंद्राचे नियमित अंगणवाडी केंद्रात रूपांतर करावे, पूर्वलक्षी प्रभावाने अतिदुर्गम तालुक्यातील अंगणवाडी कर्मचार्‍यांना प्रोत्साहन भत्ता द्यावा, एप्रिल २०१४ ते मे २०१७ या कालावधीतील बहुसंख्य अंगणवाडी कर्मचार्‍यांना अद्यापही सेवानिवृत्तीचे लाभ मिळालेले नाहीत. तो लाभ आता १० टक्के व्याजासह देण्यात यावा, अशा मागण्यांचा समावेश निवेदनात करण्यात आला आहे.

Story img Loader