नाशिक – दमदार पावसाला सुरूवात झाली नसतानाही महावितरणची वीज वितरण प्रणाली शहराच्या विविध भागात कोलमडत आहे. त्यात पंचवटीतील अमृतधाम परिसराचाही समावेश आहे. पाच ते सहा दिवसांपासून या भागात दिवसभरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने दुकानदार, व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून दररोज होणाऱ्या त्रासामुळे नागरिकही त्रस्त झाले आहेत. खंडित झालेला वीज पुरवठा कधी दीड-दोन तासाने तर, कधी पाच मिनिटांत पूर्ववत होतो. विजेच्या लपंडावामुळे घरातील टीव्ही, संगणक वा अन्य उपकरणांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.
पावसाळ्यात वीज पुरवठा यंत्रणा सुरळीत राखण्यासाठी कंपनीने व्यापक स्वरुपात मान्सूनपूर्व कामे केल्याचा दावा केला होता. तथापि, तुरळक पावसात वीज पुरवठा तांत्रिक दोष, झाडे पडणे यांसह इतर कारणांनी खंडित होत आहे. नुकताच खुटवडनगर, शाहूनगर व परिसरातील चार हजार ग्राहकांचा वीज पुरवठा सातपूर उपकेंद्रातील बिघाडामुळे सुमारे १६ तास खंडित होता. याच सुमारास वीज वाहिनीवर झाड पडल्यामुळे सारडा सर्कल ते मुंबई नाका परिसरातील २० रोहित्रे बंद झाली होती. दीड हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला. पर्यायी मार्गाने काही भागात वीज दिली गेली होती. उर्वरित वीज पुरवठा रात्री आठच्या सुमारास पूर्ववत झाला. गेल्या महिन्यात एकलहरे वीज उपकेंद्रातील रोहित्रातील बिघाडामुळे तीन दिवस महावितरणची उपकेंद्रे प्रभावित झाली होती. नाशिकरोड भागातील हजारो ग्राहकांना फटका बसला. तशीच स्थिती वडाळा, दीपालीनगर, इंदिरानगर भागात उद्भवली होती.
हेही वाचा >>> कांदा खरेदीची ईडी, सीबीआयतर्फे चौकशी गरजेची – उत्पादक संघटनेचे केंद्रीय समितीला पत्र
महावितरणच्या तांत्रिक दोषाची झळ आता पंचवटीतील अमृतधाम परिसरास सहन करावी लागत आहे. चार ते पाच दिवसांपासून या भागात सातत्याने विजेचा लपंडाव सुरू आहे. दिवसातून चार ते पाच वेळा वीज पुरवठा खंडित होतो. एकदा पावणेदोन तास वीज नव्हती. कधी अर्ध्या तासाने वीज पुरवठा सुरळीत होतो तर, कधी तासभर प्रतिक्षा करावी लागते. औंदुंबरनगर, लक्ष्मीनगर, वृंदावननगर, रासबिहारी शाळा परिसर, साईनगर, धात्रक फाटा या भागातील नागरिकांना काही दिवसांपासून या विचित्र स्थितीला तोंड द्यावे लागत आहे. दिवसभरात अनेकदा ये-जा करणाऱ्या विजेमुळे घरातील विजेवरील उपकरणे टीव्ही, फ्रिज, संगणक वा तत्सम साधनांचे नुकसान होऊ शकते. असे प्रकार मध्यंतरी राणेनगरसह काही भागात घडले आहेत. वीज पुरवठ्यातील दोषामुळे उपकरणांचे नुकसान झाल्यास त्याला महावितरणला जबाबदार धरले जाईल, असे नागरिकांकडून सूचित केले जात आहे.
हेही वाचा >>> आवक घटल्याने मुंबईत टोमॅटोचे दरशतक
अजून तीन दिवस त्रास
उपरोक्त भागात देखभाल दुरुस्तीचे काम सुरू असल्याने वीज पुरवठा खंडित करावा लागत आहे. झाडांच्या फांद्या तसेच आवश्यक दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर आहे, जिथे प्रत्यक्षात दुरुस्ती सुरू असते, त्या परिसरात काही काळ वीज पुरवठा बंद ठेवणे क्रमप्राप्त ठरते. अशा वेळी आसपासच्या भागात पर्यायी मार्गाने वीज पुरवठा केला जातो. हे बदल करण्यासाठी पाच ते १० मिनिटे लागतात. त्यामुळे कधी वीज लगेच येते आणि कधी उशिराने येते असे वाटू शकते. पुढील दोन, तीन दिवस देखभाल दुरुस्तीचे काम चालणार आहे. – किरण धनाईत (अतिरिक्त कार्यकारी अभियंता, पंचवटी उपविभाग, महावितरण)