धुळे -शिरपूर तालुक्यातील उमरदा येथील तरूणाचा मारहाणीत मृत्यू झाल्याने संतापलेल्या जमावाने शिरपूर तालुक्यातील काळापाणी येथे जाऊन ग्रामस्थांवर हल्ला केला. घरांची तोडफोड करत दागिने, धान्य व रोख रकमेसह सुमारे एक लाख ६७ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला. याप्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

१९ ते २० फेब्रुवारी दरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी २३ फेब्रुवारीच्या रात्री ११ वाजता अर्जुन पावरा (रा.काळापाणी, शिरपूर, धुळे) यांनी पोलिसात फिर्याद दिली. या फिर्यादीनुसार लोकांनी केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने उमरदा गावातील एका तरुणाचा मृत्यू झाला. काळापाणी (ता.शिरपूर) येथे ही घटना घडली होती. यानंतर अचानक उमरदा गावातील ४० ते ४५ जणांच्या जमावाने काळापाणी गावात येऊन घरांची तोडफोड केली. महिला आणि ज्येष्ठ व्यक्तींना मारहाण करून त्यांच्या घरातील रोख रक्कम, दागिने, पैसे व धान्य यांची लूट केली.

संतापलेल्या जमावाने भिमसिंग पावरा यांच्या आईचे मंगळसूत्र आणि कानातील झुमके असे सुमारे दोन लाख ४० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, ४० हजार रुपयांचा एक किलो वजनाचा चांदीचा कमरेचा कुंदरा, सुमारे दोन हजार रुपयांचे चांदीचे पैंजण आणि ५० हजार रुपये असा एक लाख ६७ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला. १५ हजार रुपयांची दोन कपाटे, एक दरवाजा हल्लेखोरांनी तोडला.

या फिर्यादीवरून पोलिसांनी उमरदा येथील रमेश वसावे, रवींद्र वसावे, सचिन वसावे यांनी त्यांच्या गावातील लोकांना भडकविल्याच्या संशयावरून या तिघांसह नीलेश पावरा, राजकुमार वळवी, दिनेश पावरा आदींसह ४० ते ४५ व्यक्तींविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेची पार्श्वभूमी अशी की, ओंकार पावरा (१८, उमरदा,शिरपूर) याने  दिलेल्या फिर्यादीनुसार सुकलाल पावरा, बाजीराव पावरा, भरलाल पावरा, रिंगण्या पावरा, राजेश पावरा, खातरसिंग पावरा (सर्व रा. कालापाणी,.शिरपूर)  आणि मिथुन पावरा (रा. निंबारी, शिरपूर) यांनी १८ फेब्रुवारीच्या रात्री उमरदा येथील रहिवासी कमलसिंग वसावे  (२०) यास डांबून ठेवले. रात्रभर लाकडी दांड्याने मारहाण केली. त्यानंतर काळापाणी गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावरील एका नाल्यात कमलसिंगचा मृतदेह आढळला.. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे संतापलेल्या उमरदा येथील जमावाने काळापाणीत हल्ला केला.

उमरदा (ता. शिरपूर) येथीक कमलसिंग वसावे (२०) या तरुणाच्या मृत्युनंतरचे हे पडसाद आहेत. पोलिसांनी या प्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. – सुनील गोसावी (उपविभागीय अधिकारी, शिरपूर, जि. धुळे)

Story img Loader