धुळे- मराठा आंदोलनाला बदनाम करण्यासाठी आणि हुकूमशहाला खूश करण्यासाठीच लाठीहल्ला झाला, असा आरोप लोकसंग्रामचे अध्यक्ष तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी समाजाने लाखोंचे मोर्चे याआधी काढले. परंतु, कुठेही गालबोट लागले नाही. मराठा समाजाच्या या शांततापूर्ण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांवर दगडफेक झाल्याची जालन्याची घटना अविश्वसनीय आहे. मतांच्या लालसेपोटी भाजप जातीय आधारावरील आरक्षणास पाठिंबा देते. आपल्या पाच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कालखंडात शेकडो वेळा कबूल करूनही देवेंद्र फडणवीस यांनी धनगरांसकट कुणालाही आरक्षण दिले नाही.
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या संस्थेने दिलेला धनगर समाजाच्या आरक्षणाचा अहवाल विधी मंडळात चर्चेला येवू दिला नाही. पण त्याचवेळी मराठा आरक्षणाला पाठिंबा देवून २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आपली मते सुरक्षित करून घेतली होती. मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन मराठा समाजाचे दिग्गज नेते असतांना पोलीस अमानुष लाठीहल्ला कसे करु शकतात, असेही गोटे यांनी म्हटले आहे.