लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
जळगाव: स्वप्नातही मंत्री होईल, हा विचार केला नव्हता. जेव्हा मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यावेळी आई शेतात निंदायला गेली होती. मला काहीएक माहिती नव्हते. अपेक्षा तर अजिबातच नव्हती. अजितदादांवर निष्णात प्रेम करणे, त्या माणसामुळे जे जीवनदान मिळाले आहे, त्याची परतफेड करणे, एवढाच उद्देश होता; पण मंत्रिमंडळाचा जेव्हा विस्तार झाला, त्यावेळी अचानकपणे सांगण्यात आले की, तुम्हाला मंत्रिपदाची शपथ घ्यायची आहे. त्यामुळे धक्काच बसला, अशी भावना अजित पवार यांच्यासमवेत मंत्रिपदाची शपथ घेणारे अमळनेरचे राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी व्यक्त केली.
मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच जळगाव येथील रेल्वे स्थानकात शुक्रवारी सकाळी आगमन झाल्यानंतर अनिल पाटील यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. रेल्वेस्थानक परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करीत पायी जात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यालाही अभिवादन केले. त्यानंतर मंत्री पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
आणखी वाचा-तीन ग्रामसेवक बडतर्फ, आठ जणांविरुध्द शिस्तभंगाची कारवाई
मी ग्रामपंचायत सदस्यापासून राजकीय कारकीर्द सुरू केली आहे. त्यामुळे तळागाळातील छोट्या छोट्या समस्यांची जाणीव आहे. आमदार झाल्यानंतर अमळनेरसारख्या छोट्या गावाला मंत्रिपदाच्या माध्यमातून संधी मिळाली आहे. जिल्ह्याच्या दृष्टीने जो विकासाचा आराखडा असेल, त्याला पूर्ण ताकदीने अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली पुढे कसे नेता येईल यासाठी प्रयत्न करणार आहे, असे त्यांनी सांगितले.
आतापर्यंत ४४ पेक्षा अधिक आमदार अजितदादांसोबत आहेत. कापसाला प्रतिक्विंटल १२ हजारांचा भाव मिळावा यांसह इतर प्रश्नांसाठी शासन आपल्या दारी या शासकीय कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तत्कालीन पक्षप्रतोद अनिल पाटील यांनी काळे झेंडे दाखविले होते. त्याविषयीही मंत्री पाटील यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, त्यावेळी आम्ही विरोधक होतो. त्यामुळे विरोधाचे काम आम्ही केले. आता आम्ही सत्तेत आहोत. त्यामुळे सत्तेचा वापर केला पाहिजे. आता जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांना सोबत घेऊन जिल्ह्याचा विकास करायचा, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार, माजी महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, ज्येष्ठ पदाधिकारी विनोद देशमुख, रवींद्र नाना पाटील, सावदा येथील माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख, अॅड. कुणाल पवार आदी उपस्थित होते.
आणखी वाचा-नाशिक: शासन आपल्या दारीची पुन्हा लगबग
जळगाव रेल्वेस्थानकात जल्लोषात स्वागत
मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अनिल पाटील यांचे पहिल्यांदाच जळगावात आगमन झाले. शुक्रवारी वाराणसी महानगरी एक्स्प्रेसने ते सकाळी सातच्या सुमारास जळगाव येथील रेल्वेस्थानकात दाखल झाले. याप्रसंगी फलाटावर राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि च्या समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. ढोल-ताशांच्या गजरात आणि जोरदार घोषणाबाजीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. पुष्पवर्षाव करण्यात आला. फलाटावरून बाहेर आल्यानंतर मंत्री पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला वंदन केले. यानंतर दोन जसीबींमधून त्यांच्यावर पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला. यानंतर अनिल पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर वंदन केले. तेथून मंत्री पाटील हे अजिंठा विश्रामगृहाकडे रवाना झाले. ते सकाळी नऊच्या सुमारास अमळनेरकडे रवाना झाले. रस्त्यात ठिकठिकाणी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. धरणगाव येथे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन व त्यांच्या सहकार्यांनी स्वागत केले.