नाशिक : संत, महंतांना लक्ष्य करत त्यांच्याविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले असून बागेश्वर धाम महंताविषयी अंधश्रध्दा निर्मूलन समितीने घेतलेली भूमिका ही इतर धर्मीयांविषयीही घ्यावी, असे आव्हान येथील साधु, महंतांनी अंनिसला देत सोमवारी रामकुंड परिसरात आंदोलन केले. अंनिसने केलेल्या दाव्याचा यावेळी निषेध करुन इतर धर्मीयांकडून होणाऱ्यांना दाव्यांना आव्हान देत त्यातील खोटेपणा सिध्द करा आणि ५१ लाख रुपयांचे बक्षीस जिंका, असे आव्हानही यावेळी महंतानी दिले.
सध्या बागेश्वरधाम येथील महंताविरूध्द अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांनी दंड थोपटले आहे. अंनिस आणि धामचे भक्त यांच्यात दावे-प्रतिदावे सुरू असतांना या वादात आता नाशिक येथील साधु, महंत, पुरोहितांनी उडी घेतली आहे. सोमवारी रामकुंड परिसरात साधु, महंतानी आंदोलन करुन जादुटोणा कायद्यात काही त्रुटी असून तो रद्द करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. यासंदर्भात पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी भूमिका मांडली. अंनिसच्या पुढाकाराने तयार केलेल्या कायद्यात त्रुटी आहेत. हा कायदा एकतर्फी असून हिंदुंना लक्ष्य ठेवत हा कायदा तयार करण्यात आला आहे. हिंदूंविरूध्दच या कायद्याचा वापर होत आहे. अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते या कायद्याचा इतर धर्मियांसाठी वापर करीत नाहीत, असा आक्षेप शुक्ल यांनी घेतला.
हेही वाचा >>> नाशिक : जादूटोणा विरोधी कायदा अधिक कठोर करावा, अंनिसची मागणी
महंत अनिकेत शास्त्री यांनी हाच मुद्दा मांडत साधु, महंतांवर हिंदू धर्मीयांची श्रध्दा असून त्यांच्याकडे होणारी गर्दी ही अनेकांसाठी पोटदुखी ठरत असल्याचा आरोप केला. बागेश्वर धाम बाबतीत हाच प्रकार घडला. तेथील महंतांनी कुठलाच दावा केला नाही. त्यांच्याकडे येणाऱ्या भक्तांनी काही प्रचार, प्रसार केला आहे. श्याम मानवसारखे लोक केवळ हिंदू धर्माविरोधात बोलतात. इतर धर्मातही असाध्य आजार बरे करण्याचे काही दावे केले करण्यात येत असल्याने त्यांनाही अंनिसवाल्यांनी आव्हान द्यावे, ते सिध्द झाल्यास ५१ लाख रुपये पारितोषिक देऊ, असे अनिकेत शास्त्री यांनी नमूद केले. याप्रसंगी आखाड्याचे महंत, साधु आदी उपस्थित होते.