लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक : पंचवटी परिसरातील एरंडवाडी या कामकरी- कष्टकरी वस्तीत ठाण मांडून बसलेल्या नीलेश थोरात या भोंदूबाबाला पंचवटी पोलिसांनी नुकतीच अटक करून त्याच्यावर जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. या पार्श्वभूमीवर शहर परिसरात भोंदूगिरी शून्यावर अशी प्रबोधनपर मोहीम पोलीस आणि महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती यांच्या वतीने राबविण्यात येणार आहे.
पंचवटीतील भोंदूबाबा हा प्लास्टिकच्या मानवी कवट्या गळ्यात घालून अघोरी विद्या करण्याची बतावणी करायचा आणि लोकांचे आर्थिक शोषण करायचा. पोलिसांसमोर त्याने तशी कबुली दिली होती. पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांना महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे (अंनिस) कार्यकर्ते भेटले. धार्मिकतेच्या नावाखाली आणि लोकांच्या देवभोळेपणाचा, धर्मश्रद्धेचा गैरफायदा अनेक भोंदूबुवा उठवतात. आपल्याला अघोरी विद्या प्राप्त असल्याचे भासवून छुप्या पद्धतीने पंचवटीच्या पंचक्रोशीत भोंदूगिरीची दुकाने चालवून भोळ्याभाबड्या भाविकांना आणि श्रद्धाळूंना फसवितात. विविध प्रकारे त्यांचे शोषण करतात. देवाधर्माच्या आणि अध्यात्माच्या नावाखाली लोकांचे होणारे शोषण आणि फसवणूक थांबविण्यासाठी पंचवटी पोलीस ठाणे आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने, “भोंदूगिरी शून्यावर”, ही प्रबोधन मोहीम राबविण्याची सूचना अंनिसच्या वतीने करण्यात आली.
आणखी वाचा-आवक घटल्याने भाजीपाला कडाडला, नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या पुरवठ्यात घट
या मोहिमेच्या माध्यमातून पंचवटी परिसरातील लोकवस्ती, झोपडपट्टी, शाळा- महाविद्यालये, अगदी आठवडे बाजारातही महाराष्ट्र अंनिसचे कार्यकर्ते वैज्ञानिक दृष्टिकोन, चमत्कार सादरीकरण, बुवाबाजी म्हणजे काय, तिचे स्वरूप, तिचे प्रकार , दुष्परिणाम, आणि ते थांबविण्याचे उपाय, अशा अंधश्रद्धा निर्मूलनाशी निगडित विविध विषयांवर कृतिशील लोकप्रबोधन करतील. तसेच, पोलीस ठाण्याचे अधिकारी जादूटोणाविरोधी कायदा, सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा आणि भोंदूगिरीला लागू पडणाऱ्या विविध कायद्यांच्या कलमांविषयी जनजागरण करतील. आगामी काळात नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही प्रबोधन मोहीम राबविल्यास पंचवटी परिसरातील भोंदूगिरीला मोठ्या प्रमाणात आळा बसू शकेल, असा विश्वास यावेळी कार्यकर्ते आणि पोलीस अधिकारी यांनी व्यक्त केला.