जळगाव – जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची निवडणूक दिवाळीदरम्यान होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अंतिम मतदार यादी मंगळवारी प्रसिद्ध होणार असून, त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. संघाच्या प्रारूप मतदार यादीवर २३ प्राप्त हरकतींवर नाशिक येथील विभागीय सहनिबंधकांकडे सुनावणी घेण्यात आली.
हेही वाचा >>> मला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचं षडयंत्र; आ. एकनाथ खडसेंचा आरोप
जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळाची मुदत २०२० मध्येच संपली आहे. मात्र, करोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व प्रकारच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली होती. ही स्थगिती मार्च २०२२ मध्ये उठविण्यात आली होती. त्यानंतर राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुकांना ३० सप्टेंबरपर्यंत स्थगिती देण्यात आली होती. ती शासनाकडून उठविण्यात आली असून, ज्या टप्प्यावर निवडणूक प्रक्रिया सुरू होती, तेथून पुढे निवडणूक प्रक्रिया राबविण्याचे आदेश सहकार विभागाच्या निवडणूक प्राधिकरणातर्फे देण्यात आल्यामुळे दूध संघाच्या निवडणुकीची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. जिल्ह्यात ४६६ संस्था दूध संघाच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी पात्र आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील मतदार संस्थांचे ठरावही प्राप्त झाले आहेत.
हेही वाचा >>> साईबाबा प्रकरणात कुणाचे चुकले? काय चुकले?
सहकार क्षेत्रातील जिल्हा बँकेनंतर सर्वांत मोठ्या असलेल्या दूध संघातील राजकारण सद्यःस्थितीत चांगलेच तापले असून, संघातील गैरकारभारासह गैरव्यवहाराच्या दुधाची उकळी फुटली आहे. तुपाप्रमाणेच १४ टन लोणी (बटर) आणि नऊ टन दूध भुकटीच्या सुमारे दोन ते अडीच कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणाच्या चर्चेलाही ऊत आला आहे. त्यातच निवडणूक प्रक्रिया होत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार एकनाथ खडसे यांनी संघाच्या निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनलसाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. दुसरीकडे भाजपचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी खडसे कुटूंबियांना असलेल्या विरोधाचा पुनरुच्चार केला.