नंदुरबार : जिल्ह्यात आरोग्य व्यवस्थेच्या अनास्थेमुळे गुरुवारी पुन्हा रुग्णवाहिकेतच प्रसूती झाली आहे. प्रकाशा प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका १५ दिवसांपासून नादुरुस्त असल्याने कलसाडी आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेतून गरोदर महिलेला नंदुरबार जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी आणले जात होते. मात्र या सर्व प्रक्रियेत बराच वेळ गेल्याने रस्त्यात रुग्णवाहिकेतच प्रसूती झाली. महिलेसमवेत प्रकाशा आरोग्य केंद्राच्या कर्मचारी असल्याने प्रसूती व्यवस्थित झाली असली तरी या प्रकारामुळे पुन्हा एकदा आरोग्य व्यवस्थेतील अनास्था उघड झाली आहे.

प्रसूती कळा सुरु झाल्यानंतर प्रमिला भील यांना नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. प्रसूतीत काही अडथळे येणार असल्याचे जाणवल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात नेण्याचे ठरविण्यात आले. प्रकाशा प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका १५ दिवसांपासून नादुरुस्त असल्याने कलसाडी आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका मागविण्यात आली. या गोंधळात एक ते दीड तास गेल्याने प्रकाशाहुन नंदुरबारकडे महिलेला आणत असताना रुग्णवाहिकेतच प्रसूती झाली.

हेही वाचा…पावसाच्या खंडामुळे भात लागवड अडचणीत, नाशिकमध्ये आतापर्यंत केवळ २७ टक्के पेरणी

महिलेबरोबर प्रकाशा आरोग्य केंद्राचे कर्मचारी असल्याने प्रसूती व्यवस्थित झाली. प्रकाशा आरोग्य केंद्राच्या नादुरुस्त रुग्णवाहिकेविषयी वरिष्ठ स्तरावर देखील कळविण्यात आले होते. आरोग्य केंद्रांची रुग्णवाहिकाच १५ दिवस नादुरुस्त राहणार असेल तर नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना आरोग्यविषयक अडचणींना कशाप्रकारे तोंड द्यावे लागत असेल, याची कल्पना न केलेलीच बरी. महिन्याभरात अशा पद्धतीने आरोग्य व्यवस्थेच्या बोजवारा उडविणाऱ्या अनेक घटना घडल्या असतानाही शासन, प्रशासन मूग गिळून आहे.

हेही वाचा…नाशिक महापालिकेच्या जागेवर भ्रमणध्वनी मनोरे, भाडेतत्वावर देण्यासाठी १० जागा निश्चित

महिला आणि बाळ सुस्थितीत आहे. प्रकाशा आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांनी मदत केल्यानेच काही गोष्टी सुकर झाल्या. प्रकाशा केंद्रातील नादुरुस्त रुग्णवाहिका तातडीने दुरुस्त केली जाईल – रवींद्र सोनवणे (जिल्हा आरोग्य अधिकारी, नंदुरबार)