नाशिक : शेतजमिनीवर कर्ज काढण्यासाठी नोंदीत फेरफार करून देण्यासाठी पंचांसमक्ष लाचेची मागणी करून १० हजार रुपयांची लाच शासकीय कार्यालयात स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिंडोरी तालुक्यातील वणी येथील तलाठी शांताराम गांगुर्डे यास ताब्यात घेतले. त्याच्यावर वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदाराची वणी येथे शेती आहे. त्यावर कर्ज काढायचे असल्याने तलाठी गांगुर्डेची भेट घेत शेतगटाच्या नाेंदीत फेरफार करण्यास सांगितले. या नोंदी दिंडोरी तहसील कार्यालयात मिळतील, असे तक्रारदारास सांगण्यात आले. त्याप्रमाणे तक्रारदार दिंडोरी तहसील कार्यालयात गेले असता आवश्यक नोंदी मिळाल्या. परंतु, तीन नोंदी वणी येथील तलाठ्याकडे मिळतील, असे सांगण्यात आले. तक्रारदार यांनी पुन्हा तलाठी गांगुर्डेची भेट घेतली.

हे ही वाचा… Jayakwadi Dam: नाशिकमधून मराठवाड्याकडे ४८ टीएमसी पाणी, गंगापूरसह १२ धरणांमधून विसर्ग

उताऱ्यावरील शेतजमिनीच्या क्षेत्राविषयी चुकीच्या नोंदी आहेत. त्या दुरूस्तीसाठी तक्रारदाराकडे १० हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर पंचासमक्ष कार्यालयात लाच स्वीकारतांना तलाठी गांगुर्डे यास लाचलुचपत प्रतिबंधकच्या पथकाने ताब्यात घेतले. निरीक्षक नितीन पाटील, पोलीस नाईक विनोद चौधरी, पोलीस शिपाई अनिल गांगोडे, चालक परशुराम जाधव यांनी या कारवाईत सहभाग घेतला.