नाशिक : रोजगार हमी योजनेतील थकीत देयक काढून देण्याच्या मोबदल्यात दोन लाख १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना नाशिक जिल्ह्याच्या सुरगाणा पंचायत समितीतील गटविकास अधिकारी महेश पोतदार याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात ताब्यात घेतले. पोतदारच्या शहरातील घराच्या झडतीत दोन लाखाहून अधिक रोकड आणि मालमत्तेची कागदपत्रे आढळली. तक्रारदार हे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत सुरगाणा तालुक्यातील गावांमध्ये पुरवठादार म्हणून काम करतात. त्यांचे या योजनेतील दोन कोटी ३२ लाख ३० हजार २७ रुपयांचे देयक थकीत आहे.
हे देयक काढण्याच्या मोबदल्यात सुरगाणा पंचायत समितीतील गटविकास अधिकारी (वर्ग एक) महेश पोतदार याने तक्रारदाराकडे दोन लाख १० हजार रुपयांची लाच मागितली. या संदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर पडताळणी करण्यात आली. तेव्हा पोतदारने पंचांसमोर दोन लाख १० हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविली. ही रक्कम स्वीकारत असताना पथकाने पोतदारला रंगेहात पकडले. त्याच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये सुरगाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी जबाबदारी सांभाळली. पथकात पोलीस नाईक किरण धुळे, विलास निकम व हवालदार संतोष गांगुर्डे यांचा समावेश होता.
घरातून मालमत्तेची कागदपत्रे हस्तगत
संशयित गटविकास अधिकारी महेश पोतदार हा नाशिक शहरातील आरटीओ कॉर्नर भागात वास्तव्यास आहे. अटकेच्या कारवाईनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लगेच त्याच्या घराच्या झडतीचे काम हाती घेतले. त्याच्या घरातून दोन लाख १० हजार रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली. मालमत्तेची कागदपत्रे मिळाल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी दिली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे आवाहन
कोणताही शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी किंवा त्यांच्यावतीने कोणीही कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी किंवा न करण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिक १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करू शकतात.