नाशिक : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने नाशिकरोड पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एका गुन्ह्यात विभागीय आयुक्त कार्यालयातील महसूल सहायकाचा तर, दुसऱ्यात सहायक पोलीस निरीक्षकाचा समावेश आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयातील महसूल सहायक कैलास वैरागे याने तक्रारदार वकिलाकडे ३० हजार रुपयांची लाच मागितली होती. विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल पुनर्निरीक्षण दाव्याचा निकाल तक्रारदाराकडील पक्षकारांच्या बाजूने लावण्याचे आणि नंतर लागलेला निकाल जाणीवपूर्वक विलंबाने अपलोड करण्याच्या मोबदल्यात वेळोवेळी भ्रमणध्वनीवर तक्रारदाराकडे ३० हजार रुपयांची मागणी महसूल सहायक वैरागेने केली होती. लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याने वैरागेविरूध्द नाशिकरोड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा…एटीएम कापून पळविण्याचा प्रयत्न, रिक्षाचालकाची सतर्कता
दुसऱ्या घटनेत सहायक पोलीस निरीक्षक गणेश शेळकेने तक्रारदाराकडून तक्रार मागे घेण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडअंती ४० हजार रुपये देण्याचे ठरले. लाच स्वीकारताना शेळके यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने अटक करण्यात आली. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.