धुळे : मोटार अपघात दाखल करुन वाहन सोडण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेणारा पोलीस उपनिरीक्षक हरिश्चंद्र पाटील आणि हवालदार रवींद्र मोराणीस या दोघांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरचा अपघात झाल्याने हे वाहन धुळ्यातील देवपूर पोलिसांनी जप्त केले होते. या किरकोळ अपघाताबाबत मोटार अपघात दाखल करुन संबंधितांचे वाहन सोडण्यासाठी देवपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी उपनिरीक्षक हरिश्चंद्र पाटील, हवालदार रवींद्र मोराणीस या दोघांनी पाच हजार रुपयांची मागणी केली. त्यामुळे संबंधित वाहन मालकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

हेही वाचा…अबब… ११,९२० गुन्हेगारांवर कारवाई; जळगाव पोलिसांची वर्षभरातील कामगिरी

तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधकच्या अधिकाऱ्यांनी शहानिशा केली. पथकाने १७ जानेवारीच्या रात्री साडेनऊ वाजता देवपूर पोलीस ठाण्यातच सापळा रचला. लाच म्हणून पाच हजार रुपये स्वीकारताना पथकाने पाटील आणि मोराणीस दोघांना रंगेहात पकडले. रात्री उशिरा देवपूर पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. शासकीय तसेच निमशासकीय कोणत्याही कामासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना पैसे देवू नयेत, कोणी पैसे मागितल्यास तक्रार करावी. तक्रार करणाऱ्याचे नाव गुप्त राखले जाईल, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anti curruption beauro caught police sub inspector and constable for taking bribe in dhule psg