धुळे : देवपूर परिसरातील स्वामी नारायण मंदिरात दहशतवादी शिरल्याचा संदेश येताच दहशतवाद विरोधी पथकासह पोलीस यंत्रणा बॉम्ब शोध पथकाला घेऊन अवघ्या दहा मिनिटात मंदिर परिसरात दाखल झाली. जवानांसह पोलिसांचा ताफा पाहताच नागरिक धास्तावले. मंदिरात शिरलेल्या दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेत ओलीस ठेवलेल्या चौघांची सुटका पोलीस आणि जवानांनी केली. पोलिसांचा हा रंगीत सराव असल्याचे लक्षात येताच भाविकांनी सुटकेचा निःश्वास सेाडला.
स्वामी नारायण मंदिरावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्यास यंत्रणा किती मिनिटात घटनास्थळी पोहचू शकते, हे पाहण्यासाठी हा सराव करण्यात आला. मंदिर व्यवस्थापकाने सोमवारी सायंकाळी पोलीस नियंत्रण कक्षाला मंदिरात दोन दहशतवादी शिरल्याची माहिती दिली. त्यानंतर अधीक्षक संजय बारकुंड यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या दहा मिनीटात दहशतवादी विरोधी, जलद प्रतिसाद, दंगल विरोधी, बॉम्ब शोध, श्वान, स्थानिक पोलीस, जिल्हा रुग्णालय, अग्निशमन अशी पथके मंदिर परिसरात धडकली. दहशतवादी विरोधी पथक, जलद प्रतिसाद पथक, दंगल विरोधी पथक हे वेगवेगळ्या मार्गाने मंदिरात दाखल झाले.
हेही वाचा >>> नाशिक : कळवण तालुक्यातून गाईंची वाहतूक; मालमोटार देवळा पोलीस ठाण्यात जमा
त्यांनी दहशतवाद्यांना ताब्यात घेत ओलीस ठेवलेल्या चार नागरिकांची सुटका केली. तसेच दहशतवाद्यांजवळील काळ्या रंगाची पिशवी जप्त करत बॉम्ब शोध आणि श्वान पथकाच्या सहाय्याने पिशवीची आणि परिसराची तपासणी केली. न्यायवैद्यक पथकाच्या मदतीने मंदिर परिसरातील वस्तूंची तपासणी झाली. यानंतर दहशतवादी हल्ल्यावेळी प्रसंगावधान राखून करावल्चा हा रंगीत सराव होता. कोणीही घाबरुन जाऊ नये, अशी घोषणा पोलिसांनी ध्वनिक्षेपकावरुन केली. यावेळी अप्पर अधीक्षक किशोर काळे, सहायक अधीक्षक एस. ऋषीकेश रेड्डी, निरीक्षक हेमंत पाटील उपस्थित होते.
युवकाचा नकली दहशतवाद्यांना प्रतिकार
हा खरोखरचा दहशतवादी हल्ला असल्याचा समज उपस्थित एका युवकाला झाल्याने, त्याने दहशतवाद्यांच्या वेषात असलेल्या पोलिसांशी हुज्जत घातली. बंधक बनविलेल्या पोलिसांच्या वेषातील नागरिकाला सोडण्यासाठी त्याने बनावट दहशतवाद्यांशी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याला सत्य समजल्यावर त्याने माघार घेतली.