नाशिक : लेव्हीच्या वादावरून बंद असणाऱ्या जिल्ह्यातील १५ पैकी केवळ पाच बाजार समित्या आतापर्यंत सुरू झाल्या असून १० समित्यांमधील लिलाव गुरुवारीही बंद होते. या ठिकाणी लिलाव सुरू करण्यासाठी सहकार विभागाकडून व्यापाऱ्यांशी चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. लिलावात सहभागी न होणाऱ्या स्थानिक व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करून थेट उत्तर भारतातील व्यापाऱ्यांना परवाने देण्याचा विचार होत आहे.
बाजार समितीत कृषि मालाच्या खरेदी-विक्रीवेळी आकारल्या जाणाऱ्या हमाली, तोलाई, वाराई वसुलीचा वाद अनेक वर्षांपासून सुरू आहे. थकीत लेव्हीच्या वसुलीसाठी माथाडी कामगार मंडळाने १४०० व्यापाऱ्यांना नोटीसा काढल्या आहेत. या विरोधात व्यापारी संघटनेने न्यायालयात अपिल करीत स्थगिती मिळवली. नंतर व्यापाऱ्यांनी हमाली, तोलाई कपात करायची नाही, त्यामुळे लेव्हीचा प्रश्न उद्भवणार नसल्याचे निश्चित केले. यामुळे माथाडी-मापारी दैनंदिन कामकाजातून बाजूला झाले. यामुळे जिल्ह्यातील जवळपास १५ बाजार समित्यांनी चार एप्रिलपासून लिलाव बंद ठेवले होते. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी प्रचलित पध्दतीने हमाली, तोलाई आणि वाराई कपात करावी आणि लिलाव सुरू करण्याची सूचना केली होती. तथापि, अनेक समितीतील व्यापाऱ्यांनी त्यास अद्याप दाद दिलेली नाही.
हेही वाचा… अवकाळीचा नाशिक जिल्ह्यातील ७२९ हेक्टरवरील पिकांना फटका
दरम्यानच्या काळात खासगी जागेवर १२ ठिकाणी व्यापारी संघटनांनी बेकायदेशीरपणे कृषिमालाचे लिलाव सुरू केल्याचे समोर आले. याबाबत माथाडी संघटनेने तक्रार केल्यानंतर सहकार विभागाने या खरेदी केंद्राच्या तपासणीसाठी १२ पथकांची नियुक्ती केली होती. ही चौकशी सुरू झाल्यानंतर खासगी जागेवर सुरू असणारे काही लिलाव बंद झाल्याचे सांगितले जाते. परंतु, पथकांचा अहवाल अद्याप आलेला नसल्याने याची स्पष्टता झालेली नाही. याच दरम्यान येवला येथे खासगी जागेत कांदा लिलाव करण्याच्या वादातून हमाल, मापारी आणि शेतकऱ्यांमध्ये वाद होऊन त्याचे रुपांतर हाणामारीत झाले होते. लासलगाव बाजारात नव्या व्यापाऱ्यांना घेऊन समितीने लिलाव सुरू केले. तशीच कार्यपध्दती अन्य बाजार समित्यांमध्ये अनुसरण्याची तयारी प्रगतीपथावर आहे. गुरुवारी जिल्ह्यातील १५ पैकी पाच बाजार समित्यांचे कामकाज सुरू असल्याचे सहकार विभागाकडून सांगण्यात आले. म्हणजे १० बाजार समित्यांचे लिलाव अद्याप ठप्प आहेत.
तिढा सोडविण्यासाठी सहकार विभागातील अधिकाऱ्यांनी पुन्हा व्यापारी संघटनेशी चर्चा केली होती. परंतु, अद्याप हा पेच सुटलेला नाही. लिलाव बंद असल्याने शेतकरी नाहक वेठीस धरले गेले आहेत. कृषिमालाचे कोट्यवधींचे व्यवहार थंडावले आहेत. बाजार समितीबाहेर कमी दरात मालाची विक्री करावी लागत आहे.
हेही वाचा… Lok Sabha Election 2024 Phase 1 Live : मणिपूरमध्ये मतदान केंद्रावर गोळीबार, तीन मतदारांचा मृत्यू
बाजार समित्यांची सद्यस्थिती
गुरुवारी लासलगाव, नाशिक, दिंडोरी, नामपूर व घोटी या पाच बाजार समित्यांमध्ये लिलाव सुरू असल्याची माहिती सहकार विभागाने दिली. पिंपळगाव, येवला, मालेगाव, मनमाड, नांदगाव, सटाणा, कळवण, सिन्नर व देवळा या बाजार समित्यांमधील लिलाव बंद आहेत. सुरगाणा बाजार समितीत लिलाव होत नसल्याची माहिती सहकार विभागाकडून देण्यात आली.
व्यापाऱ्यांना चाप लावण्याची तयारी
व्यापाऱ्यांनी आठमुठी भूमिका कायम ठेवल्यास त्यांचे परवाने रद्द केले जातील. सर्व बाजार समित्यांमध्ये नव्या आणि त्यातही उत्तर भारतातील इच्छुक व्यापाऱ्यांना परवाने देण्याचा विचार सुरू आहे. जेणेकरून स्थानिक व्यापारी माल खरेदी करून ज्या भागात पाठवतात, थेट तेथील व्यापारी नाशिकच्या बाजार समित्यांमध्ये खरेदी-विक्रीत उतरतील.