मुसळधार पावसाची पर्वा न करता शुक्रवारी तिसऱ्या पर्वणीसाठी येथे गर्दी करणाऱ्यांमध्ये महिला भाविकांची संख्या लक्षणीय राहिली. अर्थात, त्यास ऋषिपंचमीचेही कारण घडले. नाशिक येथील यंदाचे अखेरचे शाहीस्नान तसेच गणेशोत्सवानिमित्त सलग आलेल्या सुटीनिमित्त ‘पर्वणी’ साधली. कोणी आपल्या आईवडिलांना घेऊन आलेले तर कोणी पत्नीसह केवळ पर्यटन म्हणून आलेले. कोणाला पर्वणीत श्रध्दा दिसली तर, कोणाला हिंदू धर्माविषयी आस्था.
पर्वणीसाठी देशातील विविध भागातून भाविकांनी सहकुटूंब गर्दी केली होती. पावसामुळे लहान मुलांसह वृध्दांचे हाल झाले तरी ‘सब गंगा मय्या की कृपा’ असे म्हणत अनेकांनी स्नानाचा आनंद घेतला. नाशिकरोड येथील ज्योती चांदेकर यांनी पहिल्या पर्वणीसाठी झालेली पायपीट लक्षात घेत नंतरच्या पर्वणीत निर्विघ्नपणे रामकुंडावर जाता आल्याचा आनंद व्यक्त केला.
यंदा अखेरची पर्वणी असल्याने मुलांना सोबत आणले आहे. पहाटे चारपासून रामकुंडावर असून मिरवणुका पाहण्यात मुले दंग आहेत. त्यांना ही पर्वणी जवळून पाहता आली याचा आनंद वाटत असल्याचे त्या म्हणाल्या. मथुरा येथील सीमा शिनकर यांची प्रतिक्रिया परप्रांतियांची परवड अधोरेखीत करते.
सासू-सासऱ्यांना पर्वणीचा आनंद घ्यायचा होता, तीघा मुलांनाही सुटय़ा असल्याने सहकुटूंब आम्ही पर्वणीसाठी आलो. त्र्यंबकेश्वर आणि शिर्डीलाही जायचे आहे. रामकुंडापर्यंत येता येता नाकीनऊ आले. कोणीही नीट माहिती देण्यास तयार नाही. जागोजागी रस्ते बंद असल्याने कुठून कुठे जायचे ते समजले नाही. बाकी प्रशासनाने भाविकांसाठी ज्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या, त्याबाबत आम्ही समाधानी आहोत, असे मत त्यांनी व्यक्त केले.
उत्तरप्रदेश येथील अलिगढ येथे हवालदार म्हणून कार्यरत मोहनसिंग वृध्द आई-वडिलांसोबत स्नानासाठी इथपर्यंत आले आहेत. १५ जणांच्या या कुटूंबामध्ये लहान मुले आणि वृध्दांची संख्या अधिक असली तरी धार्मिकदृष्टय़ा पर्वणीला असणारे विशेष महत्व पाहता आईवडिलांना गंगा स्नानचा आनंद घेता यावा यासाठी इथपर्यंत पायपीट केली.
स्नानानंतरचा त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहता सारा थकवा दूर गेल्याचेहीे त्यांनी नमूद केले. असे असले तरी जवळच उभ्या असलेल्या नऊ वर्षांच्या मुलीला कुडकुडतांना पाहून डोळ्यातील भाव वेगळेच सांगत होते. झांशी येथील मोहन भार्गव हे वृद्ध पत्नीसह स्नानासाठी गोदाकिनारी दाखल झाले. मात्र गर्दीच्या रेटय़ात त्यांची काही वेळासाठी ताटातूट झाली. पोलिसांच्या सहकार्याने त्यांनी एकमेकांचा शोध घेत ‘सब गंगा मय्या की कृपा है’ असे म्हणत त्र्यंबककडे मोर्चा वळविला.
कल्याण येथील वंसिका जुग यांनी मुलाच्या सुटीनिमित्ते कुठेतरी दोन दिवसासाठी बाहेर जायचे होते म्हणून जवळच नाशिक येथे कुंभमेळा असल्यामुळे येथे आल्याचे सांगितले. गुरूवारी रात्री इथे आल्यावर कळले की मेळ्यामुळे नाकेबंदी आहे. परिसराची नीट माहिती नसल्याने पंचवटीतील धर्मशाळेत रात्र जागून काढली.
बरोबर चार वर्षांचा मुलगा आहे. मेळ्यानिमित्त भाविकांची अशी अडवणूक होते कळले असते तर इथपर्यंत आलेच नसते, अशी त्रासिक प्रतिक्रिया व्यक्त केली.