नाशिक – उचलबांगडी झालेले महानगरपालिकेतील वादग्रस्त शिक्षणाधिकारी बी. टी. पाटील यांच्या कार्यकाळात विहित कार्यपद्धतीचा अवलंब न करता १५ निकटवर्तीय मुख्याध्यापक, शिक्षकांना दिलेल्या केंद्रप्रमुखांच्या नियुक्ती रद्द करण्यात आल्या आहेत. संबंधितांनी आपल्या मूळ पदावर तत्काळ शाळेत हजर होऊन अध्यापनाचे कामकाज करावे, असे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांंनी दिले आहेत.

महापालिकेच्या शिक्षण विभागातील अनागोंदी कारभारावर गेल्या आठवड्यात विधीमंडळात चर्चा झाली होती. शासनाने शिक्षणाधिकारी पाटील यांची बदली करून त्यांच्या वादग्रस्त कारभाराची चौकशी सुरू केली आहे. यात नियमबाह्यपणे केंद्रप्रमुखांची नियुक्ती, त्यांच्यामार्फत झालेले कारनामे याच्या छाननीची गरज मांडली गेली. तत्कालीन शिक्षणाधिकारी पाटील यांच्या पाठबळाने काही शिक्षकांनी केंद्रप्रमुख म्हणून आपली वर्णी लावून घेतली. वार्षिक तपासणीच्या नावाखाली शिक्षकांना त्रास दिला.

महिला शिक्षिकांचा स्वतंत्र गट तयार करुन दबावतंत्राचा अवलंब केला. बदल्यांसह हक्काच्या रजेसाठी पैसे लाटल्याच्या तक्रारी झाल्या. वर्गातील विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून बोगस केंद्रप्रमुख शिक्षकांनी केलेली मनमानी व त्यांना साथ देणाऱ्यांवर कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला गेला होता. या पार्श्वभूमीवर, मनपा आयुक्त मनिषा खत्री यांनी १५ मुख्याध्यापक व शिक्षकांची केंदप्रमुखपदी केलेली नियुक्ती रद्द करुन त्यांना मूळ पदावर व शाळेत रुजू होण्याचे निर्देश दिले.

पर्यवेक्षीय संनियंत्रणासाठी मुख्याध्यापक व उपशिक्षकांच्या केंद्रप्रमुख पदावर नेमणुका करण्यात आल्या होत्या. तथापि, ही नेमणूक करताना विहित कार्यपद्धतीचा अवलंब केला नसल्याचा ठपका ठेवत १५ मुख्याध्यापक आणि शिक्षकांची केंद्र प्रमुखपदी नियुक्ती रद्द करण्यात आली. यात दीपक पगार, साहेबराव महानुभाव, छाया माळी, हमिदा अन्सारी, नितीन देशमुख, राजू दातीर, गोपालदास बैरागी, बाळासाहेब कडलग, विजय कवर, प्रकाश शेवाळे, ईश्वर चव्हाण, सुनील खेलुरकर, नितीन चौधरी, श्रृती हिंगे, वैशाली भोगे यांचा समावेश आहे.