करोनाची टाळेबंदी लागू असतानाच्या काळात ग्रामीण भागात पावसाळ्याच्या तोंडावर जलस्रोतांच्या निर्जंतुकीकरणाची मोहीम नेहमीप्रमाणे राबविली गेली. गावातील ७३१२ जलकुंभ, शाळा-अंगणवाडीतील पाण्याच्या टाक्या, पिण्याच्या पाण्यासाठी वापरात असलेल्या साडेतीन हजार विहिरी आणि तितक्याच कूपनलिकांची स्वच्छता करण्यात आली. दूषित पाण्यापासून होणाऱ्या आजारांना अटकाव घालणे, हा या उपक्रमाचा उद्देश. नाशिक जिल्हा परिषदेने स्वच्छ भारत अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीकडे सातत्याने लक्ष दिले. या कामगिरीची दखल घेऊन केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल आणि स्वच्छता विभागाच्या वतीने नाशिकला विशेष पुरस्काराने सन्मानित केले आहे.

करोना संकटपूर्व आणि करोनाकाळात जिल्हा परिषदेने स्वच्छताविषयक कामांत सातत्य राखले. काही महिन्यांपासून पाणी-स्वच्छता विभागाच्या वतीने गंदगीमुक्त भारत मोहीम, स्वच्छता हीच सेवा अभियान, हात धुवा दिन, जलकुंभ स्वच्छता, करोनाकाळात स्वच्छतेविषयक उपक्रम राबविण्यात आले. सर्व तालुक्यांचे गटविकास अधिकारी तसेच जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे त्यात योगदान लाभले. सर्वाच्या योगदानाने जिल्ह्य़ाला हा बहुमान प्राप्त झाल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी नमूद केले. हागणदारीमुक्त गाव मोहिमेत शासनाने निश्चित केलेल्या कालमर्यादेच्या दीड वर्षे आधीच जिल्ह्य़ात वैयक्तिक शौचालयांची सर्व बांधकामे पूर्ण झाली होती. सार्वजनिक शौचालयांची कामे वेगाने करण्यात आली. शौचालये बांधली गेली तरी त्यांचा कायमस्वरूपी वापर होणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्य़ात एकूण पाच लाख ७१ हजार ९६९ शौचालये असून त्यातील आतापर्यंत पाच लाख १९ हजार ९६४ शौचालयांचे सर्वेक्षण झाले आहे. सर्वेक्षण झालेल्या शौचालयांचा १०० टक्के वापर होत असल्याची माहिती पाणी-स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी दिली. या जोडीला घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत. करोनाकाळात स्वच्छतेला अनन्यसाधारण महत्त्व असल्याने ग्रामीण भागात ग्रामसेवक, स्वच्छाग्रहींमार्फत शौचालयाचा नियमित वापर, हात धुणे, वैयक्तिक स्वच्छता याबाबत काम करण्यात येत असल्याचे शेळकंदे यांनी सांगितले.

जिल्ह्य़ातील १३६८ ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छता ही सेवा उपक्रम राबविला गेला. एक लाखाहून अधिक ग्रामस्थांनी सहभागी होऊन श्रमदानातून गावची स्वच्छता केली. प्लास्टिकमुक्त गाव उपक्रमात ४२ हजार ८७८ किलो प्लास्टिक कचरा जमा करून त्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली. हा उपक्रम गावांपुरताच मर्यादित राखला गेला नाही, तर किल्ले आणि पर्यटन स्थळांच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्यात आले.

सप्तशृंगी गडावरून २.२ टन प्लास्टिक कचरा जमा करण्यात आला. धोडप, रामशेज किल्ल्यांसह पर्यटकांचे आकर्षण असणारे पालखेड, ओझरखेड धरण परिसरात स्वच्छता मोहीम राबविली गेली. जलस्रोतांचे निर्जंतुकीकरण मागील तीन वर्षांत सातत्याने केले जात आहे. करोनाकाळात त्यात खंड पडला नाही. जिल्ह्य़ात २५२८ स्वच्छाग्रही सक्रिय आहेत. १२ हजार ८५३ सार्वजनिक शौचालयांची देखभाल दुरुस्ती करण्यात आली. स्वच्छतेबाबत जनजागृतीसाठी आजवर २६ हजारांहून अधिक बैठका घेणारा नाशिक हा बहुधा पहिलाच जिल्हा असावा.

* जिल्ह्य़ातील १३६८ ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छता ही सेवा उपक्रम राबविला गेला.

* एक लाखाहून अधिक ग्रामस्थांनी सहभागी होऊन श्रमदानातून गावस्वच्छता केली.

* प्लास्टिकमुक्त गाव उपक्रमात ४२,८७८ किलो प्लास्टिक कचरा जमा करून त्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावली गेली.

* हा उपक्रमाअंतर्गत किल्ले आणि पर्यटन स्थळांच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्यात आले.

Story img Loader