नाशिक : साधारणत: दोन दशकांपूर्वी तीन अभ्यासक्रमांनी सुरुवात करणारे कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन स्कूल आता वेगवेगळ्या १७ अभ्यासक्रमांतून लष्करी अधिकाऱ्यांना प्रशिक्षित करत आहे. हवाई प्रशिक्षणात आभासी प्रशिक्षणावर (सिम्युलेटर) लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. त्या अंतर्गत हाती घेण्यात आलेले सिम्युलेटर नुतनीकरण प्रकल्प पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत पूर्णत्वास जाणार असल्याचे आर्मी एव्हिएशनचे महासंचालक लेफ्टनंट जनरल अजयकुमार सुरी यांनी सांगितले.
गांधीनगर येथील आर्मी एव्हिएशन स्कूलचा (कॅट्स) दीक्षांत सोहळा सुरी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. कोम्बॅक्ट एव्हिएटर्स प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणारे ३३ अधिकारी वैमानिक म्हणून लष्करी हवाई दलात दाखल झाले. चार अधिकाऱ्यांनी प्रशिक्षक आणि मानवरहित विमान संचलन अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या १२ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सोहळय़ात दलातर्फे हेलिकॉप्टरची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. मानवरहित विमानांचे सादरीकरण झाले. यावेळी सूरी यांनी स्कूलची वाटचाल अधोरेखीत करुन ही दलाची मुख्य प्रशिक्षण संंस्था असल्याचे नमूद केले. कुठल्याही मोहिमेत सुरक्षित उड्डाण महत्वाचे असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. हवाई प्रशिक्षणात अधिकाधिक प्रमाणात सिम्युलेटरचा वापर केला जाणार आहे. त्यासाठी विविध संस्थांशी संपर्क साधला गेल्याचे सूरी यांनी सांगितले.
हेही वाचा… नाशिक : सर्पदंशाने बालकाचा मृत्यू
हेही वाचा… नाशिक : पोलिसांची गुन्हेगारांविरुध्द तपासणी, ऑलआऊट मोहीम
हंसजा शर्मा सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थीं
कॉम्बॅक्ट एव्हिएटर्स प्रशिक्षणात सर्वोत्कृष्ट कामगिरीचा किताब पहिल्यांदा महिला अधिकारी हंसजा शर्मा यांना मिळाला. त्यांना सिल्व्हर चीता चषकाने सन्मानित करण्यात आले. प्रशिक्षक अभ्यासक्रमात उत्कृष्ट कामगिरीबद्दल मेजर आकाश मल्होत्रा, मानवरहित विमान अभ्यासक्रमातील कामगिरीबद्दल मेजर दिवाकर शर्मा, आणि मानवरहित अभ्यासक्रमात (जमिनीवरील विषय) मेजर एस. आर. जोशी यांना विविध चषकांनी सन्मानित करण्यात आले.