नाशिक : हेलिकॉप्टर वैमानिकाचे प्रशिक्षण देणाऱ्या येथील कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन स्कूलमध्ये सहाय्यक गॅरिसन अभियंता मेजर हिमांशू मिश्रा आणि उप अभियंता मिलिंद वाडिले यांना एक लाख १६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या कारवाईने प्रशिक्षण देणाऱ्या लष्करी आस्थापनेतील लाचखोरी प्रथमच समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : विश्लेषण : ‘आदिपुरुष’वर खरंच बंदी घातली जाऊ शकते का? सेन्सॉर बोर्डचे नियम जाणून घ्या

हेही वाचा : चीनला ‘जशास तसे’ उत्तर का नाही ?

लष्करी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देऊन हेलिकॉप्टर वैमानिक बनविण्याचे कार्य गांधीनगरस्थित या स्कूलमार्फत केले जाते. दरवर्षी सुमारे ७० ते ८० वैमानिक संस्थेतून लष्करी हवाई दलात दाखल होतात. संस्थेतील लष्करी अभियंता सेवा (एमईएस) विभागातील उभय अधिकाऱ्यांनी लाचेची मागणी केल्याची तक्रार कंत्राटदाराने केली होती. त्या आधारे सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला.

हेही वाचा : नंदुरबार : डाकीण असल्याच्या संशयाने स्मशानभूमीत महिलेला मारहाण

तक्रारदाराकडून ५३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सहाय्यक गॅरिसन अभियंता मेजर हिमांशू मिश्रा आणि ६३ हजार रुपये स्वीकारताना उप अभियंता मिलिंद वाडिले यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याकडून एकूण एक लाख १६ हजार रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली. दोन्ही संशयितांना अटक करण्यात आली असून शुक्रवारी दुपारी त्यांना येथील न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Army engineers arrested for accepting bribes nashik tmb 01