नाशिक : केंद्रीय राखीव पोलीस दलात उपनिरीक्षक पदापासून सेवेला सुरुवात करून खाते अंतर्गत परीक्षा देऊन सहाय्यक समादेशक (असिस्टंट कमांडंट) पदापर्यंत अवघ्या आठ वर्षांत झेप घेणारे कोब्रा बटालियनचे शहीद जवान नितीन भालेराव यांनी खडतर प्रशिक्षणात सर्वोत्तम कामगिरी नोंदविली होती. शिवाय, प्रत्यक्ष कामात देखील त्यांची हीच धडाडी कायम राहिली. जंगल युध्दतंत्रात पारंगत असणारे नितीन हे नक्षलवाद्यांविरोधातील लढाईत मोहिमांचे नियोजन, अमलबजावणीत नेहमीच आघाडीवर राहिले. लष्कर, पोलीस दलात येण्याची मनिषा बाळगणाऱ्यांसाठी मार्गदर्शन वर्ग सुरू करण्याचा नितीन यांचा मानस होता. परंतु, त्यांची स्वप्ने आता स्वप्नेच राहिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी घडविलेल्या भूसुरुंग स्फोटात शहीद झालेले कोब्रा बटालियनचे सहाय्यक समादेशक नितीन भालेराव यांच्या पार्थिवावर येथील अमरधाममध्ये शासकीय इतमामात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात वीरपत्नी रश्मी, सहा वर्षांची मुलगी वेदांगी, आई भारती आणि दोन भाऊ असा परिवार आहे. दिवाळीत नितीन हे घरी येऊ शकले नव्हते. दिवाळीनंतर सुट्टी घेऊन ते येणार होते. सुट्टीवर घरी आल्यानंतर मुलगी वेदांगी, पुतणीला व्हॉलिबॉलचे मार्गदर्शन, परदेशी भाषेचे ज्ञान देणे हा त्यांचा दिनक्रम होता. वाचनामुळे सर्वसामान्य ज्ञान अफाट. त्यामुळे वाद विवादात कोणाचा त्यांच्यासमोर फारसा निभाव लागत नसे. २१ डिसेंबर रोजी त्यांचा वाढदिवस होता. कुटुंबासमवेत तो साजरा करण्याचे नियोजन होते. पण आता सर्व काही राहून गेल्याची भावना त्यांचे भाऊ अमोल भालेराव यांनी व्यक्त केली.

जंगल युध्दतंत्राचे खास प्रशिक्षण घेणारी कोब्रा ही केंद्रीय राखीव पोलीस दलाची विशेष बटालियन आहे. नितीन यांचे युध्द कौशल्य त्यांना या बटालियनमध्ये घेऊन गेले. अमोल यांनी नितीनची गुणवैशिटय़ेही मांडली. लहानपणापासूनच सैन्य दलात अधिकारी किंवा वैमानिक होण्याचे त्याचे स्वप्न होते. त्यामुळे इयत्ता आठवीत असताना त्याने राष्ट्रीय छात्रसेना पथक अर्थात एनसीसीच्या हवाई शाखेची निवड केली. या काळात सैन्य दलाला अभिप्रेत शिस्त आणि वेळेला असणारे महत्व हे सूत्र अंगीकारले. याचा फायदा पुढील काळात झाला. बारावीच्या शिक्षणावेळी वेगवेगळ्या परीक्षा देण्यास सुरूवात के ली. २००८ मध्ये मालवाहतूक वैमानिक परीक्षा तो उत्तीर्ण झाला. तेव्हा १०० पैकी ४० विद्यार्थ्यांची निवड झाली होती. नागपूर येथे झालेल्या निवड चाचणीत तो सर्वोत्तम ठरला. परंतु, बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र नसल्याने त्याची ती संधी हुकली, असे अमोल यांनी सांगितले.

पोलीस दलाच्या परीक्षेसाठी सराव सुरू असतांना एकदा पायाला गंभीर दुखापत झाली. पण, काही दिवसांच्या विश्रांतीनंतर सराव पुन्हा सुरू ठेवला. त्याचे फलित २०१० मध्ये ‘आरसीएफ’ परीक्षेत नितीन यांची निवड होण्यात झाले. केंद्रीय राखीव पोलीस दलात ते उपनिरीक्षक म्हणून दाखल झाले.  युध्दजन्य क्षेत्रात सेवा बजावतानाही त्यांचा अभ्यास सुरू होता. खातेअंतर्गत परीक्षा देऊन २०१८ मध्ये त्यांना सहाय्यक समादेशकपदी बढती मिळाली. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या माऊंटअबू येथील अंतर्गत सुरक्षा प्रबोधिनीत त्यांनी प्राथमिक प्रशिक्षण घेतले. त्यात उत्कृष्ट प्रशिक्षणार्थीचा मान त्यांनी मिळविला.