नाशिक : अपघातात वैद्यकीय उपचारांचा प्रत्यक्षातील खर्च आणि विद्यार्थ्यांना दिली जाणारी मदत, यातील तफावत लक्षात घेऊन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने संजीवनी विद्यार्थी सुरक्षा योजनेच्या नियमावलीत काही बदल केले आहेत. त्यामुळे हाड मोडल्याच्या चिकित्सेपोटी अर्थसहाय्यात दुपटीने म्हणजे अधिकतम २० हजार तर, जे विद्यार्थी २४ तासापेक्षा कमी वेळेत उपचार घेऊन रुग्णालयातून बाहेर पडतात, त्यांना पाचपट अधिक म्हणजे अधिकतम १० हजार रुपयांचे सहाय्य दिले जाणार आहे. तसेच कमावत्या पालकाचा मृत्यू झाल्यास विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून दोन लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे.
आरोग्य विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. विद्यापीठातंर्गत राज्यात ६०० वैद्यकीय महाविद्यालये असून त्यात ७५ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांना संजीवनी विद्यार्थी सुरक्षा योजनेचा लाभ मिळतो. या योजनेच्या नियमावलीत अंशत: बदल करून विद्यार्थ्यांना जास्तीची आर्थिक मदत देण्याचे नियोजन करण्यात आल्याचे विद्यार्थी कल्याण विभागाकडून सांगण्यात आले.
हेही वाचा…लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा श्रीगणेशा; नाशिक जिल्ह्यात १६ समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती
अपघात वा तत्सम कारणांनी रुग्णालयात दाखल विद्यार्थी कधीकधी २४ तासांच्या आत उपचार घेऊन बाहेर पडतो. पूवी त्यांना केवळ दोन हजार रुपयांची मदत दिली जात होती. त्यात पाचपट वाढ करून ही मदत अधिकतम १० हजार रुपये करण्यात आली आहे. प्रत्यक्षात झालेला खर्च किंवा १० हजार रुपये यापैकी कमी असलेली रक्कम विद्यार्थ्यास मिळेल.अपघातात हाड मोडल्यास शस्त्रक्रिया वा चिकित्सेसाठी आधी १० हजार रुपयांचे सहाय्य दिले जात होते. प्रत्यक्षात उपचाराचा खर्च जास्त होत असल्याने त्यातही दुपटीने वाढ करून ती २० हजार रुपये करण्यात आली.
संजीवनी योजनेंतर्गत एखाद्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पालकांना दोन लाख रुपयांची मदत दिली जाते. यात कमावत्या पालकाचा (आई-वडील) मृत्यू झाल्यास संबंधित विद्यार्थ्याला तेवढेच अर्थसहाय्य देण्याचे निश्चित झाले. पालकांच्या मृत्युमुळे विद्यार्थ्याच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून हा बदल करण्यात आल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे.
हेही वाचा…नाशिक : ‘आदिवासी विकास’च्या उपायुक्तांचा शाही वाढदिवस चर्चेत, तीन कर्मचाऱ्यांना नोटीस
वर्षभरात पावणेतेरा लाखांचे सहाय्य
आरोग्य विद्यापीठाच्या संजीवनी विद्यार्थी सुरक्षा योजनेंर्गत २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात १२ लाख ७५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले. योजनेचा लाभ २० विद्यार्थ्यांना मिळाला. सहा प्रकरणे मृत्युशी संबंधित होती, असे विद्यार्थी कल्याण विभागाकडून सांगण्यात आले.