लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक: बागलाण तालुक्याच्या पश्चिम भागात पडणाऱ्या पावसामुळे धरणात जलसाठा होतो आणि तालुक्यासह इतर भागातील जनतेची तहान भागते. परंतु, ज्या आदिवासी बांधवांच्या भागात पाऊस कोसळतो, तिथे मात्र नंतर वर्षभर टंचाईला तोंड द्यावे लागते. डोंगरदऱ्यात शाश्वत जलस्रोत नाही. रस्त्याअभावी शासकीय टँकरचा पाणी पुरवठाही अशक्य ठरतो. या पार्श्वभूमीवर, आमदार दिलीप बोरसे यांनी स्थानिक पातळीवर टँकर उपलब्ध करून देत परिसरातील जनतेची तहान भागविण्याचा प्रयत्न केला आहे. बोरसे यांच्या आमदार निधीतून आदिवासी पाड्यांवर पाण्यासाठी चार पाण्याचे टँकर वितरित करण्यात आले.

तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील साल्हेर, मानूर, भावनगर आणि वाठोडा या चार ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या पाड्यांवर पाणी पुरवठा करण्यासाठी आमदार निधीतून पाच हजार लिटर क्षमतेचे चार टँकर उपलब्ध करून दिले. आमदार बोरसे व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत हे टँकर सुपूर्द करण्यात आले. या भागात उंचावर खडक असल्याने पावसाळ्यानंतर परिसरात भीषण पाणी टंचाई निर्माण होते. त्यामुळे ग्रामस्थ व महिलांना रानोमाळ भटकून पाण्याची तजवीज लावावी लागते. अनेक वर्षापासून हे दुष्टचक्र कायम आहे. यावर तोडगा काढण्यासाठी चार टँकर सुपूर्द केले आहेत. साल्हेर ग्रुप ग्रामपंचायतींतर्गत १० पाडे, मानूर अंतर्गत १२ पाडे, वाठोडांतर्गत पाच तसेच भावनगर अशा एकूण २८ वस्ती पाड्यांवर यामुळे पाणीपुरवठा करता येणार आहे. यामुळे पाण्यासाठी होणारी भटकंती थांबणार आहे.

आणखी वाचा-भुसावळ- मनमाड तिसऱ्या रेल्वे मार्गिकेच्या कामास गती

कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळास नऊ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त केंद्र शासनाची विकास कामे व योजनांची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे आदिवासी बांधवांना वाटप करण्यात आले. याप्रसंगी बाजार समितीचे माजी संचालक तुकाराम देशमुख, माजी पंचायत समिती सभापती समाधान सूर्यवंशी, साल्हेरच्या सरपंच राणी भोये, उपसरपंच लक्ष्मण गावित, सदस्य मधुकर देशमुख, वसंत भोये, दगा भोये, आदी उपस्थित होते. विस्तार अधिकारी नितीन देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arrangement of tankers for shortage affected villages in baghlan mrj
Show comments