नाशिक – गांजाची तस्करी करणाऱ्यांचा पाठलाग करुन आडगाव पोलिसांनी २८ किलो गांजा जप्त करत एका संशयिताला ताब्यात घेतले. या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते अधिकारी आणि अंमलदार यांना प्रशस्तीपत्र व रोख रक्कम देत गौरविण्यात आले. संशयितास पोलिसांनी अटक करुन न्यायालयात उपस्थित केले असता १० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
नाशिक पोलीस आयुक्त कर्णिक यांच्या संकल्पनेतून गुन्हे प्रतिबंधासाठी थांबवा आणि शोधा (स्टॉप अँड सर्च) मोहीम राबवण्यात येत आहे. या माध्यमातून वाहने थांबवून अचानक तपासणी करण्यात येत आहे. आडगाव पोलीस ठाणे हद्दीत महामार्गावर मंगळवारी पहाटे अडीचच्या सुमारास नववा मैल येथे अंमलदार बाळकृष्ण पवार आणि हवालदार भाऊराव गांगुर्डे हे थांबवा आणि शोधा मोहिमेतंर्गत तपासणी करत असताना लाल रंगाची मोटार दोघांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने मोटार थेट त्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा >>> Video : पुणे-पाचोरा एसटी बसचा दणदणाट…स्टेअरिंगचा थरथराट…प्रवाशांचा थरकाप…
दोघांनी मोटारीचा पाठलाग सुरु करत नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यानंतर गुन्हे शाखेचे वाहन, आडगाव पोलीस ठाण्याचे वाहन कर्तव्यावरील पोलीस निरीक्षक, तपासणी कर्तव्यावरील पोलीस निरीक्षक, मुंबईनाका, भद्रकाली आणि पंचवटी या पोलीस ठाण्यांकडून अधिक कुमक मागवण्यात आली. आठ वाहनांनी मिळून संशयित वाहनाचा २५ किलोमीटर पाठलाग केला. नववा मैल ते द्वारका, द्वारका येथे वळण घेत अमृतधाम आणि अमृतधाम चौफुलीवर वळण घेत के. के. वाघ महाविद्यालय आणि महाविद्यालयाजवळ वळण घेत चक्रधर स्वामी मंदिरापर्यंत अशी तस्करांच्या मोटारीने पोलिसी वाहनांना हुलकावणी दिली.
हेही वाचा >>> येवला, लासलगाव आगारांना बसेसचा तुटवडा, कार्यवाही करण्याची छगन भुजबळ यांची मागणी
अखेर चक्रधर स्वामी मंदिराजवळ रस्ताच बंद झाल्याने संशयित पळून गेले. पोलिसांनी चालक आकाश डोळस (३६, रा. पनवेल) यास अटक केली. विशेष म्हणजे, हा पाठलाग रात्री लोकवस्ती असणाऱ्या परिसरात करण्यात आला. पाठलाग करणाऱ्या पोलीस वाहनांची प्राथमिकता ही संशयित वाहन निर्मनुष्य वस्तीकडे घेवून जाणे आणि त्या ठिकाणी मोटारीसह चालकास ताब्यात घेणे ही होती. त्यानुसार सर्व पोलीस वाहनांनी आपआपसात समन्वय साधत वाहन निर्मनुष्य वस्तीकडे नेण्यास भाग पाडले. या कालावधीत पाच पैकी चार संशयित अंधाराचा फायदा घेत फरार झाले. मोटारीत २८ किलो गांजा आढळला. गांजा व वाहन असा १५ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. आडगाव पोलीस ठाण्यात आकाश डोळस याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून इतर संशयितांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.