नाशिकमध्ये उपक्रम सुरू होणार; भारतीय मांजरीची वंशावळही तयार करणार

विभक्त कुटुंबव्यवस्थेत एकटेपणा टाळण्यासाठी सोबत म्हणून पाळीव प्राणी विशेषत: मांजरींना सांभाळण्याकडे अनेकांचा कल आहे. पाश्चात्त्य प्रजातींच्या मांजरींना त्यात विशेष पसंती मिळत असताना केवळ माहितीअभावी ग्राहकांची फसवणूक होत आहे. या पाश्र्वभूमीवर, जागतिक संघटनेच्या सहकार्याने ‘कॅट फॅन्सिअर्स ऑफ इंडिया’ या सावळ्या गोंधळावर नियंत्रण मिळविण्यासाठी देशात प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविणार आहे. या उपक्रमाची सुरुवात नाशिकमधून होत असून भारतीय मांजरीची वंशावळही तयार करण्यात येणार आहे.

द नाशिक कॅनाइन क्लब, कॅट फॅन्सिअर्स असोसिएशन (वर्ल्ड) आणि कॅट फॅन्सिअर्स असोसिएशन ऑफ इंडिया वतीने प्राणी संगोपनात येणाऱ्या पालकत्वाची जबाबदारी यावर लक्ष केंद्रित करीत विविध उपक्रमांची आखणी करीत आहे. मांजरीच्या संगोपनावर लक्ष केंद्रित करतानाच जागतिक पातळीवर मांजरीची वंशावळ जपणाऱ्या संघटनेची चर्चा करीत भारतात याचे काम सुरू करण्यात आले आहे. भारतात पाळीव प्राण्यांमध्ये कुत्र्यांसोबत मांजर पाळण्याकडे अनेकांचा कल असतो. अधिक जागा लागत नसल्याने तिचा स्वभाव, स्वच्छता पाहता अनेक जण मांजरीला प्राधान्य देतात.

मांजर देणारा हा उद्योग भारतात चांगलाच बहरलेला आहे. त्यात कोणतीही मांजर कोणत्याही पाश्चात्त्य नावाने ग्राहकांच्या माथी मारली जाते. ग्राहकांची अशी फसवणूक टाळण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. पाश्चात्त्य आणि भारतीय मांजर संगोपन यातील फरक, मांजरीची काळजी कशी घ्यावी, या विषयी माहिती दिली जाईल.

संगोपनातील दरी भरून काढत भारतात मांजर संगोपनाचा दर्जा सुधारावा, यासाठी कॅट फॅन्सिअर्स ऑफ इंडिया काम करणार आहे. यासाठी नाशिक, बंगळुरू, हैदराबाद, दिल्ली, मुंबई या ठिकाणी केंद्र उभारत नजीकच्या काळात कामास सुरुवात होणार आहे. भारतात मांजरीची वंशावळ तयार करीत वेगवेगळ्या मांजरीच्या प्रजातीची नोंद, त्यांची आरोग्य, स्वच्छता, बाळंतपण आदी विषयांवर काळजी कशी घ्यावी, यावर मार्गदर्शनपर व्याख्याने आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या उपस्थितीत होतील.

भारतात मांजर उद्योग विखुरलेला असून आजही मांजरीचे संगोपन योग्य पद्धतीने कसे व्हावे याची फारशी माहिती नागरिकांना नाही. तसेच पर्शियन, सयामी अ‍ॅबेझिनियस अशा विविध परदेशी मांजराच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक करीत त्यांना दुसरेच कोणतेही मांजर दिले जाते. यामुळे हा व्यवसाय एकत्रित करीत त्यांना मांजरीची काळजी कशी घ्यावी, त्यांच्या बाळंतपणात, त्यांचे वाढलेले केस कसे कापावेत, त्यांना होणारे त्वचाविकार, मांजरीची स्वच्छता कशी राखावी, कोणत्या प्रजातीचा नर व मादी यांच्या मीलनातून योग्य ब्रीड तयार होईल, आदीची माहिती देण्यात येणार आहे.  – निखिल पंडित, (सचिव, कॅट फॅन्सिअर्स असोसिएशन ऑफ इंडिया)

Story img Loader