पोषक हवामानामुळे या हंगामात दर्जेदार द्राक्ष अधिक्याने उपलब्ध होणार असले तरी सध्या माल खरेदीत व्यापारी सर्रास ५०० व एक हजाराच्या नोटा उत्पादकांच्या माथी मारत आहेत. जुन्या नोटा न स्वीकारल्यास द्राक्ष बाग खरेदीलाच नकार दिला जातो. यामुळे उत्पादकांची कोंडी झाली आहे. देशांतर्गत बाजारात द्राक्षास सध्या जागेवर प्रति किलो ६५ ते ७५ तर निर्यातीसाठी ११० ते १५० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. नोटाबंदीनंतर भाजीपाला व कांद्याचे भाव गडगडले असताना द्राक्ष मात्र आपला तोरा कायम ठेवून आहे. दर्जेदार द्राक्षामुळे निर्यातीचे प्रमाणही वाढण्याची चिन्हे आहेत.

जिल्ह्य़ात तब्बल पावणेदोन लाख एकर क्षेत्रावर द्राक्ष बागा असून कळवण व सटाणा भागातील माल बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. समाधानकारक पावसामुळे या वेळी गतवर्षीसारखी टंचाईची स्थिती नाही. दीड महिन्यापासून सकाळी गारवा, तर दिवसभर आकाश निरभ्र असते. हवामान चांगले असल्याने अतिरिक्त औषध फवारणीतून सुटका होऊन खर्चात बचत झाली. या वातावरणामुळे दर्जेदार उत्पादन हाती घेण्यास मदत होईल. स्थानिक पातळीवर थॉमसन सीडलेस, सोनाका, माणिकचमन, शरद सीडलेस, जम्बो सीडलेस या द्राक्षांचे उत्पादन होते. थॉमसन सीडलेस ही द्राक्ष निर्यातीत आघाडीवर असतात. हंगामाच्या प्रारंभी बाजारात येणाऱ्या द्राक्षांना दरवर्षी चांगला भाव मिळतो. हे वर्षही त्यास अपवाद नसले तरी निश्चिलनीकरणाचे वेगवेगळे परिणाम झाल्याचे दिसून येते. देशांतर्गत बाजारासह युरोप, रशिया, दुबई व बांगलादेश आदी ठिकाणी द्राक्ष पाठविण्यास सुरुवात झाली आहे. चलन तुटवडय़ामुळे दिल्लीतील आझादपूर मंडी आठवडय़ातून तीन दिवस बंद असते. यामुळे उर्वरित केवळ तीन दिवसांत तिथे माल पाठवता येतो, असे द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक खंडेराव शेवाळे यांनी सांगितले.

निर्यातीबाबतचे चित्र अस्पष्ट

बांगलादेश व देशातील इतर भागांतील व्यापारी नाशिकमध्ये येऊन माल खरेदी करतात. बाजार समितीप्रमाणे द्राक्ष खरेदी-विक्रीवर कोणाचे नियंत्रण नाही. संबंधित व्यापाऱ्यांकडून रद्दबातल झालेल्या नोटा दिल्या जात असल्याची उत्पादकांची तक्रार आहे. नोटा स्वीकारण्यास नकार दिला तर द्राक्ष खरेदीच नाकारली जाते. डिसेंबरपूर्वी हे चलन बँकेत भरता येणार असल्याने ते स्वीकारण्याशिवाय गत्यंतर नसल्याचे उत्पादकांचे म्हणणे आहे. या व्यवहारात मोठय़ा प्रमाणात काळ्याचे पांढरे केले जात असल्याचे दिसून येते. व्यापारी द्राक्षांसाठी जागेवर किलोला ६५ ते ७५ रुपयांचा भाव देतात. निर्यातक्षम काळ्या द्राक्षास १५० रुपये तर सोनाकाला १२५ रुपये भाव आहे. युरोपमध्ये पाठवल्या जाणाऱ्या पिवळ्या द्राक्षांना ११० तर रशियात जाणाऱ्या द्राक्षांसाठी ८५ ते ९० रुपये भाव मिळत आहे. उर्वरित पट्टय़ातील द्राक्ष पुढील एक ते दीड महिन्यानंतर मुबलक स्वरूपात बाजारात आल्यानंतर हे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात येतील. मागील वर्षी दोन लाख टन द्राक्ष निर्यात झाली होती. या वर्षी निर्यातीसाठी ३० हजार द्राक्ष बागांची नोंदणी झाली आहे. गतवर्षीच्या दुष्काळाच्या परिणामांचा अद्याप पूर्ण अंदाज नसल्याने निर्यातीचे चित्र कसे राहील, याबाबत संघटना साशंक आहे.

‘नाशिकच्या एकूण द्राक्ष निर्यातीपैकी २० ते २५ टक्के निर्यात एकटय़ा बांगलादेशमध्ये होते. इतर देशात माल पाठविताना उत्पादाकाला धनादेश अथवा ‘आरटीजीएस’च्या माध्यमातून निर्यातदार पैसे देतात. पण, बांगलादेशचे व्यापारी स्थानिक पातळीवर रोख पैसे देऊन माल खरेदी करतात. संबंधितांकडून सध्या रद्दबातल चलन दिले जात आहे. डिसेंबरनंतर हे चलन उत्पादकांना स्वीकारता येणार नाही. त्या वेळी हे व्यापारी काय धोरण स्वीकारतात, यावर निर्यातीचे भवितव्य अवलंबून राहील.’

कैलास भोसले (अध्यक्ष, मध्यवर्ती विज्ञान समिती, बागायतदार संघ)

चांगल्या हवामानामुळे औषधांचा खर्च कमी झाला. परंतु मजुरीचा खर्च वाढला आहे. ग्रामीण भागात मजूर मिळत नसल्याने जादा मजुरी देऊन त्यांना आणावे लागते. शेतकऱ्यांमध्ये मजूर पळविण्याची स्पर्धा सुरू आहे. नोटाबंदीमुळे मजुरी देताना सुटय़ा पैशांची चणचण भासते. दरवर्षी द्राक्ष घडात साखर उतरल्यानंतर ‘मिलीबग’ रोगाचा प्रादुर्भाव जाणवतो. या वर्षी त्याचा साखर उतरण्याआधीच काही ठिकाणी प्रादुर्भाव झाला आहे.

          – धीरज तिवारी (द्राक्ष उत्पादक, वणी)