हिमकडा दुर्घटनेच्या पाश्र्वभूमीवर लष्करी छावण्यांची ठिकाणे बदलणार?
जम्मू-काश्मीरमध्ये नऊ ते २० हजार फूट उंचीवरील चौक्या सांभाळणाऱ्या लष्करी जवानांना पाककडून होणारी आगळीक व घुसखोरांना प्रतिबंध घालण्याबरोबर सध्या नैसर्गिक आपत्तीशीही निकराची झुंज द्यावी लागत आहे. बर्फाच्छादित द्रास, कारगिल, दक्षिण काश्मीर आणि लेह-लडाखच्या आघाडीवरील निम्म्यांहून अधिक चौकींसमोर सध्या गुरेझ व सोनमर्गसारखे नैसर्गिक आपत्तीचे आव्हान उभे आहे. हिमकडा कोसळल्याने उद्भवलेल्या स्थितीचा अभ्यास लष्कराने सुरू केला आहे. त्याअंतर्गत विविध पातळीवर विश्लेषण करताना नियंत्रण रेषेलगतच्या काही चौक्यांची ठिकाणे पुढील हिवाळ्यात बदलावी लागतील काय, याचाही विचार होणार आहे.
हिमकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत १५ जवान मृत्युमुखी पडल्यानंतर लष्कराने त्या अनुषंगाने हालचाली सुरू केल्याचे उपरोक्त भागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. या क्षेत्रात दरवर्षी हिम वादळे आणि हिमकडा कोसळणे या नैसर्गिक आपत्ती तसेच या वातावरणाने थकवा व हृदयविकाराच्या धक्क्याने आजवर शेकडो अधिकारी-जवानांचा मृत्यू झाला आहे. आंतरराष्ट्रीय सीमा रेषेच्या तुलनेत नियंत्रण रेषा आणि प्रत्यक्ष ताबा रेषेची सुरक्षितता राखणे अधिक जिकिरीचे ठरते. जम्मूतील पूँछपासून उत्तुंग पीरपंजाल पर्वतरांगाना सुरुवात होते. काश्मीरमध्ये ही उंची वाढत जाऊन लेह-लडाख विभागात ती १८ हजापर्यंत पोहोचते. सियाचीन ही तर जगातील सर्वाधिक उंचीवरील युद्धभूमी. नऊ हजार फूटहून अधिक उंचीवरील हे संपूर्ण पर्वतीय क्षेत्र सध्या बर्फाच्छादित आहे. या भागात तैनात जवानांना हवामानाची पूर्वसूचना देऊन गस्त घालण्याच्या वेळा बदलवणे, गस्तीसाठी धोकादायक ठरू शकणाऱ्या मार्गाऐवजी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. चौकीत कार्यरत जवानांची एरवी विशिष्ट काळाने लष्करी तळाकडून अदलाबदली होते. परंतु, या काळात ही प्रक्रिया थांबते. या स्थितीत आपली चौकी सांभाळणे व गस्त घालण्याचे काम तैनात जवान करतात. त्यावेळी आवश्यक ती खबरदारी घेण्यात येते. परंतु, अकस्मात कोसळणाऱ्या नैसर्गिक आपत्तीसमोर कधीकधी पर्याय राहत नाही, अशी पुष्टी अन्य अधिकाऱ्याने जोडली.
उपरोक्त दुर्घटनांच्या पाश्र्वभूमीवर, त्या भागात किती बर्फवृष्टी होते, यापूर्वी अशी दुर्घटना घडली आहे काय आदींचा अभ्यास केला जाणार आहे.
पाच जवानांची सुटका
काश्मीर खोऱ्यातील गुरेझ आणि सोनमर्ग येथे हिमकडे कोसळून १५ जवानांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी मच्छिल भागात लष्करी तळाजवळ हिमकडा कोसळून पाच जवान त्यात अडकण्याची घटना घडली. मात्र, या पाचही जवानांची सुखरूप सुटका करण्यात लष्कराला यश आले. पाचही जवानांची प्रकृती स्थिर असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे लष्करी सूत्रांकडून सांगण्यात आले.
शारीरिक क्षमतेची कसोटी
१० हजार फूटहून अधिक उंच पर्वतीय क्षेत्रातील आघाडीवर लष्करी तुकडीला साधारणपणे दोन वर्ष तैनात राहावे लागते. या ठिकाणी तैनात होण्याआधी प्रत्येकाची संपूर्ण वैद्यकीय तपासणी केली जाते. त्यात विरळ हवामान व बर्फवृष्टीत तग धरण्याची क्षमताही जोखली जाते. या तपासणीनंतर संबंधितांना खालील भागातील लष्करी तळावर काही दिवस ठेवले जाते. वातावरणाशी एकरूप करत प्रशिक्षण देऊन त्यांना आघाडीवर पाठविले जाते.
तीन महिन्यांची तयारी
द्रास, कारगिल, दक्षिण काश्मीर, लेह-लडाख या क्षेत्रातील आघाडीवरील चौकी व लष्करी तळ बर्फवृष्टी झेलत आहेत. बहुतांश चौकींशी रस्ते मार्गाने संपर्क खंडित आहे. उपरोक्त भागात हिवाळा सुरू होण्याआधीच तीन महिने पुरेल इतके इंधन, खाद्य पदार्थ व थंडीपासून बचावासाठीच्या साहित्याची साठवणूक केली जाते. तसेच एखादी आपत्ती कोसळल्यास बचाव कार्यासाठी लागणारी सामग्री चौकीत असते. जेणेकरून काही दुर्घटना घडल्यास लगतच्या चौकीवरील जवान जलद प्रतिसाद देतात.