माहिती अधिकारात मिळालेले उत्तर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रामकुंड परिसरात गोदावरीला येऊन मिळणाऱ्या अरुणा उपनदीच्या संरचनेत इंद्रकुंड ते रामकुंडापर्यंत कोणताही बदल न करता उताररूपी रस्ता बांधल्याचे मान्य करणाऱ्या महापालिकेच्या अभिलेखावरून वर्षभरात ही नदी अंतर्धान पावल्याचे उघड झाले आहे. अरूणा नदीबाबत तसेच रामकुंडातील अरुणा गोमुखाबाबत माहिती अधिकार कायद्यान्वये विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना महापालिकेने गोदावरी संवर्धन कक्षाच्या अभिलेखावर ही नदी आढळून येत नसल्याचे उत्तर देत हात वर केले आहे.

वाढत्या शहरीकरणात या उपनदीवर इतकी बांधकामे झाली की, ती कधीच लुप्त झाली आहे. त्यात महापालिकेने तिचे अस्तित्व नाकारल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या सर्व घटनाक्रमाची माहिती गोदावरी नदी, उपनद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणारे गोदाप्रेमी नागरी समितीचे अध्यक्ष देवांग जानी यांनी दिली.

अरुणा उपनदीचे रामकुंडात असणाऱ्या गोमुखातून प्रतिदिन येणारे पाणी, या उपनदीच्या उगमस्थानापासून ते रामकुंडातील गोमुखापर्यंतची लांबी, रुंदी, खोलीची तपशीलवार माहिती, या उपनदीच्या पात्रात झालेल्या बांधकामांची माहिती, अरुणा नदीचे पात्र कुठे पाहता येईल, असे प्रश्न जानी यांनी महापालिकेकडे माहितीच्या अधिकार कायद्यान्वये विचारले होते. या सर्व प्रश्नांना महापालिकेने विचारलेली माहिती गोदावरी संवर्धन कक्ष विभागाच्या अभिलेखावर आढळून येत नाही हे एकच उत्तर दिले आहे.

पंचवटीतील अरुणा-गोदावरीच्या तटावर अर्थात रामकुंडावर सिंहस्थ कुंभमेळा भरतो. १८८३ च्या नाशिक गॅझेटीयरमध्ये अरुणा, वरुणा (वाघाडी) या उपनद्यांचा उल्लेख आढळतो. बॉम्बे प्रेसिडेंसी गेझेटीयर, नाशिकच्या १८८३ मधील नकाशात अरुणा नदी स्पष्टपणे दिसून येते. सिटी सर्वे विभागाच्या १९१७ च्या मूळ ‘डीएलआर’ नकाशात अरुणा नदी दर्शविणारा नकाशा उपलब्ध आहे. महत्त्वाची बाब म्हणजे जनहित याचिकेत उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार याचिकाकर्ते जानी यांनी महापालिकेच्या तत्कालीन आयुक्तांसमोर गोदावरीसह तिच्या उपनद्यांसंबंधी सादरीकरण केले होते. त्यासंबंधीच्या लेखी उत्तरात तत्कालीन आयुक्तांनी अरूणा नदी अभिलेखावर असल्याचे सांगितले. तसेच अरुणा नदीपात्रावर इंद्रकुंड ते रामकुंडापर्यंत रस्ता बांधल्याचे मान्य करत नदीच्या संरचनेत कोणताही बदल न करता ते बांधकाम केल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

गोदावरी नदी आणि तिच्या उपनद्यांना प्रदूषणातून सोडविण्यासाठी एप्रिल २०१७ पासून गोदावरी संवर्धन कक्षाची स्थापना करण्यात आली असे नमूद आहे. एकदा अरुणा उपनदी अभिलेखावर असल्याचे मान्य करणाऱ्या महापालिकेने वर्षभरात त्यासंबंधी उत्तर देताना ती अभिलेखावरच नसल्याचे उत्तर दिले आहे.

हा तर गुन्हा

‘बॉम्बे प्रेसिडेंसी गॅझेटीयर १८८३’ मधील नकाशा, सिटी सर्वे १९१७ च्या ‘डीएलआर’ नकाशाद्वारे अरुणा नदीच्या अस्तित्वाचे सबळ पुरावे मिळतात. असे असतांना महापालिकेने अरुणा नदीचे अस्तित्व नाकारणे नदीची माहिती उपलब्ध करून न देणे हा गुन्हा असून त्या विरोधात कायदेशीर सल्ला घेऊन महापालिकेविरोधात अपील दाखल करणार आहे. या उपनदीवर मोठय़ा प्रमाणात अतिक्रमणे होऊन तिचे पात्र लुप्त झाले आहे. अरुणा उपनदी पुनरूज्जीवित करून गोदावरी-अरुणा संगम पूर्ववत करण्याकरिता आगामी काळात प्रयत्नशील राहणार आहे. गरज पडल्यास उच्च न्यायालयात दाद मागितली जाईल.

-देवांग जानी , याचिकाकर्ते

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aruna tributary missing