नाशिक: दिवाळीत सलग ११ ते १३ दिवस बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडणार आहे. निर्यात शुल्कामुळे व्यापाऱ्यांनी यापूर्वीच अनेक दिवस लिलाव बंद ठेवले होते. आता कामगार सुट्टीवर जाणार असल्याचे कारण देत पुन्हा जवळपास दोन आठवडे लिलाव बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांना माल विक्रीचा मार्ग बंद झाला आहे. त्याचा परिणाम ऐन सणोत्सवात देशांतर्गत बाजारात कांद्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. कांदा व अन्य कृषिमालासह धान्याचे लिलाव बंद राहणार असले तरी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याचे लिलाव नेहमीप्रमाणे होणार आहेत. भाजीपाला नाशवंत माल असल्याने बाजार समिती दिवाळीत सुट्टी न घेता काम करणार आहे.
विविध बाजार समितीतील कांदा व धान्य व्यापाऱ्यांनी दीपावली सणानिमित्त कांद्यासह धान्याचे लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. लासलगाव बाजार समितीत मंगळवारपासून बंद झालेले कांदा लिलाव आता थेट २० नोव्हेंबरला पूर्ववत होतील. तसेच धान्य विभागातील व्यापारी १० ते १८ नोव्हेंबर या कालावधीत लिलावात सहभागी होणार नाहीत. त्यामुळे धान्याचे लिलाव कांद्याप्रमाणे २० नोव्हेंबरपासून पुन्हा सुरु होतील. या काळात शेतकऱ्यांनी गैरसोय टाळण्यासाठी कांदा व धान्य विक्रीस आणू नये, असे आवाहन बाजार समितीने केले आहे. मनमाडसह अन्य बाजार समितीत कांदा व्यापारी लिलावात सहभागी होणार नसल्याने नऊ ते १८ नोव्हेंबरपर्यंत कांदा लिलाव बंद राहणार आहेत.
हेही वाचा… ऐन दिवाळीत नाशिकमध्ये पाणीबाणी; गळतीमुळे सहा प्रभागांत पुरवठा ठप्प; सलग दोन दिवस फटका
चाळीत साठवलेला कांदा खराब होण्याच्या स्थितीत आहे. त्याची वेळेत विक्री न झाल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. दुसरीकडे सणोत्सवात कांदा विकून दोन पैसे मिळवण्याची संधी दुरावली आहे. कांदा लिलाव बंद राहणार असल्याने शेतकर्यांची मोठी अडचण होणार आहे. मनमाड बाजार समितीत कांदा- मका व धान्य विभागाचे कामकाज बंद राहणार आहे. या बाजार समितीत बुधवारी कांदा लिलाव केवळ सकाळच्या सत्रात झाले. नऊ ते १८ नोव्हेंबरपर्यंत कांदा लिलाव बंद राहतील. २० नोव्हेंबरपासून ते पूर्ववत होतील. मका व धान्य लिलाव १७ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत.
काही दिवसांपासून कांदा दरात मोठी घसरण होत आहे. पाच हजार रुपयांवर गेलेला दर आठवडाभरात १२०० ते १३०० रुपयांनी घसरला. लाल कांदा किरकोळ प्रमाणात विक्रीसाठी येत आहे. किमान निर्यात मूल्य ८०० रुपयांवर नेल्याने निर्यात पूर्णत: थंडावली. घसरत्या दराबरोबर लिलाव बंदची झळ शेतकऱ्यांबरोबर ग्राहकांनाही बसण्याची शक्यता आहे.
भाजीपाला लिलाव सुरू राहणार
भाजीपाल्याचा मुख्य घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक बाजार समितीत दिवाळीत नियमितपणे लिलाव सुरू राहणार आहेत. भाजीपाला नाशवंत माल आहे. त्याचे लिलाव बंद ठेवणे शेतकरी हिताचे ठरणार नसल्याने बाजार समितीत सणोत्सवात नेहमीप्रमाणे लिलाव होतील. लक्ष्मीपूजन, दीपावली पाडवा वा भाऊबीज या दिवशी भाजीपाल्याची आवक काहिशी कमी असेल, तरी नेहमीप्रमाणे लिलाव होतील, असे बाजार समितीकडून सांगण्यात आले. या बाजार समितीतून मुंबई व उपनगरात भाजीपाला पुरवठा केला जातो. दररोज १५० ते २०० मालमोटारी भाजीपाला घेऊन मार्गस्थ होतात. लिलाव सुरळीत राहणार असल्याने सणोत्सवात मुंबईचा भाजीपाला पुरवठा सुरळीत राहणार आहे.