नाशिक – आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तकांच्या संपादरम्यान मान्य केलेल्या मागण्यांचा शासन निर्णय जाहीर न झाल्याने तसेच अन्य प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आयटक आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने बुधवारी येथे पंचायत समिती कार्यालय आणि महानगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी पालकमंत्री दादा भुसे यांची भेट घेतली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या निवेदनात भूमिका मांडली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानात राज्यातील सुमारे ७० हजार आशा स्वयंसेविका व साडेतीन हजारापेक्षा अधिक गटप्रवर्तक कार्यरत आहेत. संबंधितांनी प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी १८ ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर या कालावधीत संप केला. त्यावेळी आरोग्य मंत्र्याबरोबर कृती समितीची बैठक झाली. बैठकीत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना दिवाळी भेट दोन हजार रुपये दिवाळीपूर्वी देण्यासह अन्य मागण्यांबाबत आरोग्यमंत्र्यांनी आश्वासन दिले होते. परंतु, त्यानंतरही गटप्रवर्तक व आशा यांच्या मोबदल्यात समाधानकारक वाढ झालेली नाही. उलट वेगवेगळ्या योजनासंदर्भात ऑनलाईन कामे करण्याच्या सूचना येत आहेत. ही कामे पूर्ण करण्यात दिवसरात्र मेहनत घेण्यात येत असल्याचे आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांनी म्हटले आहे.

हेही वाचा >>>जळगाव जिल्ह्यातील तीनही मंत्र्यांचा काळे फुगे सोडून आदिवासी कोळी समाजातर्फे निषेध

आशा स्वयंसेवकांच्या मोबदल्यात सात हजाराची आणि गट प्रवर्तकांच्या मोबदल्यात एक हजाराची वाढ करावी, गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचारी दर्जा द्यावा, केंद्र सरकारला पाठविलेल्या प्रस्तावाचा पाठपुरावा करून त्वरीत कारवाई करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, आंदोलकांनी पालकमंत्री दादा भुसे यांची भेट घेत कामात येणाऱ्या अडचणींची माहिती दिली. यावेळी आशा, अंगणवाडी सेविकांनी काळ्या साड्या नेसून सरकारच्या निष्क्रियतेचा निषेध केला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asha volunteers and group promoters protest in front of the panchayat samiti office municipal corporation to bring attention to the pending demands during the strike amy